
यवतमाळ शहरातील पिंपळगाव बायपासवर शुक्रवारी विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. निशा फुंदे (38) जखमी शिक्षिकेचे नाव आहे. धडकेनंतर कारने दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत नेली. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
निशा त्रिलोक फुंदे या जाजू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या दुचाकीने शाळेत जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी दिगंबर पुंडलिकराव फुंदे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी डॉ. किशोर टोंगे (45) यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





























































