
फ्रान्समध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरू असून जनता रस्त्यावर उतरली आहे. या निदर्शनांना शनिवारी हिंसक रूप प्राप्त झाले. देशभरात झालेल्या निदर्शनांदरम्यान प्रचंड तोडफोड, लुटालूट करण्यात आली. अनेक सरकारी आणि खासगी मालमत्तांना आगीच्या हवाली करण्यात आले. यामुळे खळबळ उडाली असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यापुढील आव्हान वाढले आहे. सरकार विरोधात असंतोष वाढत असल्याने आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
पॅरिससह अनेक प्रमुख शहरांमध्ये शेकडो तरुण रस्त्यावर उतरले. वेगवेगळे मुखवटे घालून रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी करत दुकाने फोडली आणि लुटालूट केली. सुपरमार्केट, औषधविक्रेती दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने आणि लक्झरी बुटीक यांना यावेळी लक्ष्य करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून ही लुटालूट चालल्याचे दिसून आले. या हिंसेत फ्रान्सचे ऐतिहासिक शहर लिमोज येथील 140 वर्षांहून अधिक जुने ऐतिहासिक ‘टाऊन हॉल’ आंदोलकांनी पेटवून दिले. याशिवाय मार्सेल आणि लिल येथील टाऊन हॉलचीही तोडफोड करण्यात आली.
फ्रान्समध्ये जनता रस्त्यावर उतरली; सरकारविरोधात आंदोलन तीव्र, लिमोज शहरातील 140 वर्षे जुनी ऐतिहासिक ‘टाउन हॉल’ इमारत पेटवली https://t.co/6aVaoairmY
— Saamana Online (@SaamanaOnline) October 18, 2026
दरम्यान, हिंसक आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला. गृह मंत्रालयाच्या मते या निदर्शनांमध्ये सुमारे 5 लाख 50 हजार लोक सहभागी झाले होते, तर युनियनच्या दाव्यानुसार हा आकडा 8 लाखांच्या घरात होता. या चकमकींमध्ये तब्बल 1 हजार 200 जणांना अटक करण्यात आली असून 150 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सेंट-एटिएन शहरात एका 17 वर्षीय मुलाच्या हातावर सुरक्षा दलाचा ग्रेनेड फुटल्याने त्याचे हात गमवावे लागले.
आखातातील युद्धामुळे युरोपमध्ये महागाई गगनाला भिडली आहे. वाढती महागाई आणि जीवनमान खालावल्यामुळे नागरिक संतप्त झाले असून मॅक्रॉन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. या आंदोलनावर मॅक्रॉन यांनीही प्रतिक्रिया दिली असून तोडफोड करणाऱ्या, तसेच सरकारी कार्यालय किंवा दुकानांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.



























































