मोदी सरकारला झटका, CEC च्या मुद्द्याला पाठिंबा देणाऱ्या पक्षाने मत बदललं; दिला कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वायएसआर काँग्रेस पक्षाचे (YSRCP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या तरुण आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे दक्षिण हिंदुस्थानातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, रेड्डी यांचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील INDIA आघाडीकडे कल वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

CJP ला पाठिंबा

14 ऑक्टोबर रोजी रेड्डी यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले होते की, व्यवस्थेत काही त्रुटी आहेत आणि त्या दूर करणे गरजेचे आहे. निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करणे आवश्यक आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक केल्याने कोणताही प्रश्न सुटणार नाही, उलट परिस्थिती आणखी बिघडेल.
सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे, असे रेड्डी म्हणाले होते.

यापूर्वी जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पाठिंबा दिला होता. मात्र, आता त्यांच्या भूमिकेत बदल होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे YSRCP आणि INDIA आघाडी यांच्यात जवळीक निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधात सुरू असलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणांमुळेही ते सध्या चर्चेत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या सुनावणीसोबतच केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) प्रकरणांची सुनावणी सुरू असताना, CBI न्यायालयाने ED च्या प्रकरणांचीही दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रेड्डी यांची बदलती राजकीय भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

आंध्र प्रदेशातील त्यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी आणि मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष (TDP) NDA मध्ये महत्त्वाच्या स्थानावर आहे. त्यामुळे केंद्रातील राजकारणात आपले पर्यायी समीकरण तयार करण्यासाठी रेड्डी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट झाल्याची चर्चा

या घडामोडींशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, जगन मोहन रेड्डी यांनी अलीकडेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे सल्लागार विष्णू रेड्डी यांनी या भेटीची व्यवस्था केल्याचे सांगितले जात आहे.

तसेच, रेड्डी आणि काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यात बंगळुरूमध्ये भेट झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, या दोन्ही बाजूंकडून अशा भेटीची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

दुसरीकडे, YSRCP ने या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तेलुगू देसम पक्षाकडून YSRCP विरोधी पक्षांच्या गोटात जात असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी या अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा पक्षाने केला आहे.

निवडणूक आयोगाविरोधात YSRCP आक्रमक

जगन मोहन रेड्डी यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेसोबतच निवडणूक आयोगाबाबतही YSRCP ने आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि कार्यकाळ) कायदा, 2023 याला पाठिंबा दिला होता.

आता मात्र निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पूर्वीची निवड समिती पुन्हा लागू करण्याची मागणी YSRCP ने केली आहे. या जुन्या व्यवस्थेत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश होता.

जगन मोहन रेड्डी यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. 2024 च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत YSRCP ने नऊ प्रश्न उपस्थित केले आहेत.

यामध्ये मतदानाच्या टक्केवारीतील कथित विसंगती, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (EVM) बॅटरीच्या नोंदी, मतमोजणीतील कथित तफावत आणि निवडणुकीशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध करण्यास झालेला विलंब या मुद्द्यांचा समावेश आहे. या आरोपांबाबत निवडणूक आयोगाची भूमिका आणि संबंधित पुरावेही महत्त्वाचे ठरणार आहेत.

डाव्या पक्षांशीही जवळीक वाढवण्याचे प्रयत्न

जगन मोहन रेड्डी यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेचे आणखी एक उदाहरण सप्टेंबरमध्ये पाहायला मिळाले. त्यावेळी त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) शिष्टमंडळाची भेट घेतली आणि सरकारच्या धोरणांविरोधात संयुक्त आंदोलने करण्याची घोषणा केली.

भाकप हा INDIA आघाडीचा घटक असल्याने या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी YSRCP ने विरोधी पक्षांच्या या आघाडीसोबत थेट संबंध जोडण्याबाबत सावध भूमिका घेतली होती. त्यामुळे डाव्या पक्षांशी वाढणारी जवळीक ही रेड्डी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील बदलत्या रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे.