
नवी दिल्ली – वंदे भारतसह अनेक ट्रेनचे पीएनआर सीरिजमध्ये बदल करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेने याबाबत मोठा निर्णय घेतला असून नवी यंत्रणा लागू झाली की, तिकीट बुकिंग सुलभ होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. आता नोव्हेंबर, डिसेंबरच्या तिसऱया आठवडय़ापासून गतिमान एक्सप्रेस, खजुराहो वंदे भारत ट्रेन आणि ताज एक्सप्रेससह दोन डझनांहून अधिक ट्रेनच्या पीएनआर मालिकेत बदल होणार आहेत. पीएनआर मालिकेचे सुरुवातीचे अंक बदलले जाणार आहेत. या बदलामुळे तिकीट बुकिंग अधिक सोपे होणार आहे.
सौदी अरेबियाची विमानसेवा ठप्प
नवी दिल्ली – आखाती देशांतील तणावाचा परिणाम विमानसेवेवर झाला आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्प्रेसने सौदी अरेबियासाठीची उड्डाणे येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्यामुळे तणाव वाढला आहे. यापूर्वी जेहाद, रियाध आणि दमाम या शहरांसाठीची उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव इंडिगो आणि अकासा एअरनेही काही उड्डाणांवर निर्बंध घातले आहेत.
नऊ वर्षांच्या मुलावर बिबटय़ाची झडप
बल्लारपूर – महाकाली देवीच्या दर्शनासाठी जाणाऱया भाविकांवर बिबटय़ाने हल्ला केला. एका नऊ वर्षांच्या मुलास बिबटय़ाने सर्वांसमोरच उचलून नेले. दैव बलवत्तर म्हणून बालकाचा जीव वाचला. कार्तिक जाधव असे बालकाचे नाव आहे. ही घटना चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील चुनाभट्टी बस थांब्याजवळ घडली. बिबटय़ाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला कार्तिक बाजूच्या झुडपात हालचाल करताना दिसून आला. त्यानंतर त्याला तातडीने एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. त्याची प्रकृती सुधारत आहे.

























































