भाजप विरोधात सूर; पाठिंबा देऊन चूक केली! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतील बदलांवर जगन मोहन रेड्डी यांचा आक्षेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱया तरुणांना आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी पाठिंबा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीची प्रक्रिया बदलण्याच्या निर्णयाला मोदी सरकारला पाठिंबा देऊन चूक केली, असे जगन मोहन रेड्डी म्हणाले. केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणाऱया जगन मोहन रेड्डी यांच्या नव्या भूमिकेमुळे देशातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

अमरावती येथे एका पत्रकार परिषदेत रेड्डी यांनी निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवरून मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, परीक्षेत परीक्षकाची नियुक्ती विद्यार्थी करू शकत नाही. त्याचप्रमाणे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती सत्ताधाऱयांनी करावी अशी स्थिती कधीच यायला नको. आम्ही या निवड प्रक्रियेला पाठिंबा दिला होता. मात्र, आज आम्हाला त्याचा पश्चात्ताप होत आहे. आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली रेड्डी यांनी दिली. राज्यातही निवडणूक आयुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्री किंवा सरकारने करायला नको. ही नियुक्ती निःपक्ष प्राधिकरणाकडून व्हायला पाहिजे, असे रेड्डी म्हणाले.

निवडणुकीवरील विश्वास पुन्हा स्थापित झाला पाहिजे

कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाला रेड्डी यांनी पाठिंबा देताना सांगितले की, सीजेपीच्या नेत्यांना अटक करून प्रश्न सुटणार नाहीत, उलट परिस्थिती चिघळेल. निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा स्थापित झाला पाहिजे. यंत्रणेत त्रुटी आहेत आणि त्यात सुधारणा करायला हवी, असे रेड्डी म्हणाले.

2029च्या निवडणुकीवर लक्ष

जगन मोहन रेड्डी यांनी एनडीएमध्ये सामील न होता संसदेत अनेक महत्त्वाच्या कायद्यांना पाठिंबा दिला होता. आंध्र प्रदेशात सत्ता गमावल्यानंतर त्यांनी केंद्रासोबत थेट संघर्ष टाळला होता. मात्र, आता ते दिल्लीत नवे मित्र शोधत असून 2029मध्ये होणाऱया सार्वत्रिक निवडणुकांवर डोळा ठेवून राजकीय भूमिका आखत असल्याचे बोलले जात आहे.