युरोपात सत्तेविरोधात उठाव! फ्रान्स, इटली, अल्बानिया, बेल्जियम, जर्मनी, पोर्तुगाल, ग्रीसमध्ये लाखो लोक रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्ताधाऱयांच्या बेबंदशाहीविरोधात जगातील अनेक देशांत असंतोष खदखदत असून युरोपात जनतेने उठाव केला आहे. फ्रान्स, इटली, अल्बानिया, बेल्जियम, स्पेन, जर्मनी, पोर्तुगाल, ग्रीसमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. पॅरिस, मिलानसह अनेक शहरांत सरकारविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागून दंगली भडकल्या आहेत. दगडफेक, जाळपोळ, तोडपह्ड, लुटालूट सुरू असून प्रचंड तणाव पसरला आहे. फ्रान्समध्ये 1800 हून अधिक लोकांना तर इतर देशांतही शेकडो आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

  फ्रान्सची राजधानी पॅरिससह विविध शहरांमध्ये मास्क घालून लाखो लोक रविवारी रस्त्यावर उतरले. या लोकांनी दुकाने लुटली. आगी लावल्या. सरकारी इमारती, सुपरमार्पेट्स आणि लक्झरी स्टोअर्सना लक्ष्य केले. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या वाहनांवर हल्ले केले. यात 500 हून अधिक पोलीस जखमी झाले असून मालमत्तेची मोठी हानी झाली आहे.

दोषींना सोडणार नाही – मॅक्रॉन

फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हिंसाचाराच्या घटनांचा तीव्र निषेध केला. तोडफोड, लुटमार आणि जाळपोळीसारख्या घटनांना जे जबाबदार असतील त्यांच्यावर कायदेशीर खटले चालवले जातील आणि त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असा इशारा मॅक्रॉन यांनी दिला.

143 वर्षे जुनी वास्तू आगीत खाक

फ्रान्समधील लिमोज शहरात मास्कधारी आंदोलकांनी 143 वर्षे जुन्या एका ऐतिहासिक वास्तूला आग लावली. त्यात ही वास्तू पूर्ण खाक झाली. लोकांचा उद्रेक इतका प्रचंड होता की, पॅरिसमधील ‘प्लास द ला रिपब्लिक’ परिसरात रस्त्यावरील दगडी फरशादेखील उखडून टाकण्यात आल्या, दुकाने फोडण्यात आली. पर्यटकांची रेलचेल असलेल्या परिसरातही लुटमार आणि तोडफोडीच्या घटना घडल्या.

मिलानमध्ये बारमधील टेबलांचे बॅरिकेड्स!

इटलीत मेलोनी सरकारविरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले. वाढती महागाई हा आंदोलनाचा प्रमुख मुद्दा होता. मिलानमध्ये पोलिसांनी मोर्चाला अटकाव केल्याने शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन हिंसक झाले. बारमधील टेबल बाहेर काढून पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. हे बॅरिकेड्स आंदोलकांनी जाळून टाकले. काही आंदोलकांनी दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांवर दगडफेक केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर व पाण्याचा मारा केला. या सगळय़ामध्ये 50 हून अधिक आंदोलक तर दोन पोलीस जखमी झाले.

पोर्तुगीज म्हणतात, घरांच्या किमती आटोक्यात आणा!

पोर्तुगालमधील सरकाविरोधी आंदोलनाची पहिली ठिणगी राजधानी लिस्बनमध्ये पडली. येथील रोसियो चौकात शेकडो लोक एकत्र आले. घरांच्या आणि अन्नधान्यांच्या किमती नियंत्रणात आणा, अशी घोषणाबाजी सुरू केली. बघता बघता देशाच्या इतर शहरांत आंदोलनाचा हा वणवा पसरला.

देशाच्या सीमा सील करा – ट्रम्प

फ्रान्सच्या आंदोलनावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनासाठी त्यांनी स्थलांतरितांना जबाबदार धरले आहे. ‘फ्रान्स जळत आहे! मनात द्वेष भरलेल्या आणि वेगळय़ा जगातून आलेल्या स्थलांतरितांनी एकेकाळी महान असलेल्या या देशाला उद्ध्वस्त केले आहे,’ असे ट्रम्प म्हणाले. ‘वेळ निघून जाण्याआधी फ्रान्सने आपल्या सीमा सील कराव्यात आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे,’ असे आवाहन ट्रम्प यांनी केले.

का झाला उठाव?

अन्नधान्य व इंधनाची वाढती महागाई, शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा, बेरोजगारी, घरांच्या वाढत्या किमती, सार्वजनिक सेवासुविधांचा घसरलेला दर्जा आणि या सगळय़ाबाबत सरकारची उदासीनता याविरोधात युरोपात लोकांचा उद्रेक झाला आहे. सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे व दिलासा द्यावा, अशी जनतेची मागणी आहे.

अॅपल, लुई व्हिटॉन, हर्मेस ब्रॅण्डचे शोरूम लुटले!

महागाईच्या विरोधातील राग आंदोलकांनी ब्रॅण्डेड वस्तूंच्या शोरूम्सवर काढला. फ्रान्समध्ये पॅरिस, मार्सेई, बोर्डो, लील या शहरांत आंदोलक अॅपल, लुई व्हिटॉन आणि हर्मेस ब्रॅण्डच्या शोरूम्समध्ये घुसले. तिथे तोडफोड आणि वस्तूंची लूट करण्यात आली.

आंदोलकांवर मेलोनी भडकल्या!

इटलीत आंदोलकांनी केलेल्या हिंसाचारामुळे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी संतापल्या. ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ‘आंदोलने आणि निदर्शनांचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण शहरे उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही,’ असे त्या म्हणाल्या.