पश्चिम रेल्वेवर आता ‘स्मार्ट’ तिकीट तपासणी, टीसींना बॉडी कॅमेरे असलेली विशेष जॅकेट्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईळ फोटो

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकांतील तिकीट तपासणी आता अधिक ‘स्मार्ट’ होणार आहे. लोकलच्या प्रवासात तिकीट तपासनीसांसोबत (टीसी) प्रवाशांचे होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने टीसींना विशेष डिझाईन केलेली जॅकेट्स उपलब्ध करून दिली आहेत. या जॅकेट्सची विविध वैशिष्टय़े असून यात खासकरून बॉडी कॅमेऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासी आणि टीसी यांच्यातील संपूर्ण संभाषणाचे रेकार्ंडग होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सद्यस्थितीत प्रायोगिक तत्त्वावर काळय़ा रंगातील आकर्षक रचना असलेली 30 विशेष जॅकेट्स टीसींना देण्यात आली आहेत. तिकीट तपासणीदरम्यान टीसींवर प्रवाशांकडून हल्ला झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रवाशांसोबतचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी जॅकेटमध्ये इन-बिल्ट बॉडी कॅमेरा लावण्याची सुविधा आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि टीसी व प्रवासी यांच्यातील वाद कमी होण्यास मदत होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष जॅकेट्समध्ये तिकीट तपासणीसाठी लागणारे हँड-हेल्ड टर्मिनल, इलेक्ट्रॉनिक फेअर मशीन आणि व्हॉईस एम्प्लीफायर ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे बनवण्यात आले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना सुलभतेने संवाद साधण्यासाठी हेडसेटची व्यवस्था करण्यात आली आहे. हे काळ्या रंगाचे जॅकेट महिला आणि पुरुष दोन्ही कर्मचाऱ्यांसाठी सारखेच आहे. या पायलट प्रोजेक्टला यश मिळाल्यास इतर विभागांमध्येही हा प्रयोग राबवला जाण्याची शक्यता आहे.