
जिद्दीला मर्यादा नसतात आणि इच्छाशक्तीसमोर अडथळे टिकत नाहीत, याचा प्रत्यय देणाऱ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेचा रविवारी जपानमध्ये दिमाखात शुभारंभ झाला. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या हस्ते पाचव्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाले. नागोया येथील पालोमा मिझुहो स्टेडियमवर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात हिंदुस्थानी पथकाने तिरंगा अभिमानाने उंचावत शानदार प्रवेश केला. पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि धावपटू सिमरन शर्मा यांनी हिंदुस्थानी पथकाचे ध्वजवाहक म्हणून नेतृत्व केले.
18 ते 24 ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱया या स्पर्धेत आशियातील सर्व 45 देश सहभागी झाले आहेत. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व देशांचा सहभाग नोंदवला गेला आहे. एकूण 18 क्रीडा प्रकारांत पदकांसाठी चुरस रंगणार असून हिंदुस्थानी खेळाडूंचे लक्ष्य दमदार कामगिरीसह देशाच्या पदकतालिकेत भर घालण्याचे असेल.
हिंदुस्थानी जर्सीवर सिंधू संस्कृतीचा रुबाब!
उद्घाटन सोहळय़ात हिंदुस्थानी खेळाडूंच्या पोशाखाने विशेष लक्ष वेधून घेतले. गडद निळय़ा रंगाच्या ब्लेझरवर सोनेरी रंगातील नक्षीकाम करण्यात आले होते. सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध ‘प्रिस्ट-किंग’ मूर्ती, ‘डान्सिंग गर्ल’ शिल्प आणि प्राचीन मुद्रा यांपासून प्रेरित आकृत्यांनी या पोशाखाला ऐतिहासिक वारशाची झळाळी दिली. खिशावर तिरंगा, तर कॉलरवर सप्तसिंधूच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीकात्मक दर्शन घडवण्यात आले. प्राचीन हिंदुस्थानी संस्कृतीचा अभिमान आणि आधुनिक क्रीडामहत्त्वाकांक्षा यांचा सुरेख संगम या पोशाखातून साधण्यात आला.
168 हिंदुस्थानी खेळाडूंचे पदकांसाठी आव्हान
हिंदुस्थानने या स्पर्धेसाठी 281 सदस्यांचे पथक पाठवले आहे. त्यामध्ये 112 पुरुष आणि 56 महिला अशा एकूण 168 खेळाडूंचा समावेश आहे. हिंदुस्थानी खेळाडू 11 क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू आणि अधिकाऱयांचे स्वागत केले. खेळाडूंचे धैर्य, दृढनिश्चय आणि आव्हानांवर मात करण्याची वृत्ती समाजाला पॅरा क्रीडा प्रकारांची ताकद दाखवून देईल, असे त्यांनी नमूद केले.
उद्घाटनापूर्वीच हिंदुस्थानी संघाची विजयी सुरुवात
उद्घाटन सोहळ्यापूर्वीच काही क्रीडा प्रकारांतील सामने सुरू झाले होते. पुरुषांच्या गोलबॉलमध्ये हिंदुस्थानने कतारवर, तर महिलांच्या गोलबॉलमध्ये थायलंडवर विजय मिळवला. व्हीलचेअर बास्केटबॉलच्या सुरुवातीच्या सामन्यांत यजमान जपानने पुरुष आणि महिला गटांत विजय नोंदवला. आता 24 ऑक्टोबरपर्यंत विविध क्रीडा प्रकारांत पदकांची लढाई रंगणार आहे.
























































