
बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यात कवठे गावच्या हद्दीत आठजणांनी फिल्मी स्टाइलने दुचाकीवरून थरारक पाठलाग करून केलेला रोड रॉबरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने 12 तासांत उघड केला. यातील आठही आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून 1.55 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
गोपीनाथ तानाजी कदम, मंगेश एकनाथ जाधव, ऋतिक रमेश कदम, आदित्य हणमंत कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे, निखिल दिलीप कदम, अक्षय शांताराम मोझर (सर्व रा. मालगाव, जि. सातारा) व निषीध शरद साबळे (रा. शिवथर, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आरोपींपैकी गोपीनाथ कदम हा कराड येथे कुरीअर कंपनीत कामाला आहे. त्याला कोल्हापूर येथील मार्क एक्स्प्रेस कुरीअर या कंपनीची महिंद्रा बोलेरो पिकअप केव्हा कोल्हापूरवरून पुण्याला आणि पुण्यावरून कोल्हापूरला जाते, याची माहिती होती. त्याने आरोपी मंगेश जाधव याला शुक्रवारी (दि. 16) सकाळी कुरीअरची पिकअप (एमएच 09 एफएल 5423) पुण्यावरून कोल्हापूरला जाणार असून, त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने असल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून ही गाडी लुटण्याचा प्लॅन केला. माहितीप्रमाणे पिकअप शुक्रवारी सकाळी पुण्यावरून निघाली. त्यावेळी खेडशिवापूर टोलनाका तसेच कापूरहोळ येथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी तीन वेगवेगळ्या दुचाकींवरून पिकअपचा फिल्मी स्टाइलने पाठलाग केला. वाई तालुक्यातील कवठे गावच्या हद्दीत सकाळी सातच्या सुमारास आरोपींनी पिकअपला दुचाकी आडवी मारून थांबवले.
पिकअपचालकास कोयत्याचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. यादरम्यान आरोपींनी पिकअपचा पाठीमागील दरवाजा उघडून गाडीतील सोन्या-चांदीचे दागिने तसेच चांदीच्या विटा असलेले पोते लुटून धूम ठोकली.
या धाडसी दरोडय़ाची (रोड रॉबरी) खबर मिळताच, जिल्हा पोलीसप्रमुख निखिल पिंगळे, अपर अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व उपअधीक्षक विपुल पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिविक्षाधीन उपअधीक्षक पूनम झगडे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, भुईंजचे सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे, वाठारचे सहायक निरीक्षक सुशील भोसले यांना तपासाच्या सूचना दिल्या.
पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तत्काळ सहायक निरीक्षक अभिजीत यादव, रोहित फार्णे, उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी यांच्या अधिपत्याखाली तपास पथके तयार केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या खांद्याला खांदा लावून भुईंज, वाठार, सातारा शहर व कराड शहर गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तपास पथके गुह्यातील आरोपींची सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होती. यावेळी निरीक्षक विश्वजीत घोडके यांना आरोपींसंदर्भात व त्यांच्या हालचालीसंदर्भात माहिती मिळावी. त्यानुसार पोलीस पथकाने आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.




























































