भाजपचे कर्तृत्व फोडाफोडी आणि गद्दारीचेच! – विनायक राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘भाजपचे कर्तृत्व केवळ फोडाफोडी आणि गद्दारीचे आहे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हे इमानदारीने जनतेला आधार देणारे आणि मदतीला धावून जाणारे आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सत्तेच्या दडपशाहीविरोधात लढण्यासाठी पुणे पदवीधरमधून शिवसेनेचे सुनील मोदी यांना निवडून देऊन भाजपल धडा शिकवा,’ असे आवाहन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केले.

पुणे पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपनेत्या सुषमा अंधारे, शहरप्रमुख वसंत मोरे, सहसंपर्कप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महादेव बाबर, गटनेते नितीन गावडे, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, प्रकाश भेगडे, स्वाती ढमाले, राम थरकुडे, युवराज पारिख, राजेश मोरे, पंढरीनाथ खोपडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

विनायक राऊत म्हणाले, ‘सुनील मोदी हे निष्ठावान, निःस्वार्थी आणि संघर्ष करणारे शिवसैनिक कार्यकर्ते आहेत. दुसरीकडे घनशक्तीच्या जोरावर निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत. मात्र, अशा उमेदवारांसमोर शिवसेनेचा लढाऊ कार्यकर्ता टिकणार नाही, असे समजण्याचे कारण नाही. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. अशा लढाईत नेहमी जनशक्ती जिंकते, हा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार हेच आमचे पाठबळ असून, सुनील मोदी यांच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे राहावे.’

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरूनही विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पेइंग गेस्ट आणि हॉटेल व्यावसायिकांना लक्ष्य करण्यात आले. ‘एमपीएससी’च्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही कारवाई केली जाते. अशा दडपशाहीला चाप लावण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी उद्धव ठाकरे यांनी जंतरमंतरवर जाऊन भूमिका घेतली होती. आता भाजपच्या दडपशाहीला घडा शिकवण्याची हीच वेळ आहे.’

भाजपची फोडाफोडीची नीती – सुषमा अंधारे

सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘पुणे पदवीधर मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने स्वतंत्रपणे सुनील मोदी यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. भाजपला प्रत्येक पक्षाच्या कुटुंबात फूट पाडण्याची सवय असून, त्यांची ही कुटिल नीती आहे. पदवीधरांच्या अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्यांनी पुण्यात झालेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनातील विद्यार्थ्यांची भेट का घेतली नाही? त्यांच्या प्रश्नांवर तेव्हा आवाज का उठवला नाही?’ असा सवाल त्यांनी भाजप उमेदवाराला करून समाचार घेतला.

‘विरोधी उमेदवारांकडे मोठी आर्थिक ताकद असली, तरी ही निवडणूक विद्यार्थी पदवीधरांनी हातात घेतली आहे. सुनील मोदी यांना विद्यापीठ अधिसभेतील कामाचा अनुभव असून, प्रशासनाचीही माहिती आहे. त्यामुळे पदवीधर मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे,’ असे आवाहन अंधारे यांनी केले.

मेळाव्यात सुनील मोदी यांनी ४७हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा उल्लेख करीत, ‘कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रचाराला लागावे, विजयापर्यंत पोहोचण्याचा निर्धार करावा, असे आवाहन केले. संजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. युवराज पारिख यांनी आभार मानले.