
दसऱ्याच्या मुहूर्तावर मार्केटयार्डातील फूलबाजारात झेंडूची विक्रमी आवक झाली. शनिवारी आणि रविवारी मिळून सुमारे २०० ते ३०० टन झेंडू बाजारात दाखल झाला. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार झेंडूला किलोला ३० ते ७० रुपये भाव मिळाला. दसऱ्यानिमित्त फुले खरेदीसाठी नागरिकांनी रविवारी (दि. १८) सकाळपासून मार्केटयार्ड आणि महात्मा फुले मंडईत गर्दी केली होती. मात्र, मार्केटयार्डातील शिवनेरी रस्ता, भुसार बाजार आणि नेहरू रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी घर, दुकाने आणि वाहनांच्या सजावटीसाठी तसेच पूजेसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे पुणे, सोलापूर, धाराशिव, बीड आणि हिंगोली परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडू विक्रीसाठी आणला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फुलांची आवक अधिक होती. झेंडूसह शेवंती, गुलछडी, अॅष्टर, गुलाब आणि जर्बेरा या फुलांनाही मागणी होती. फुलांची आवक आणि मागणी दोन्हीत वाढ झाल्याने काही फुलांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती फूल आडतदार सागर भोसले यांनी दिली.
” यंदा फुलांना चांगली मागणी आहे. दसऱ्यानिमित्त झेंडू, शेवंती, गुलाब, अॅष्टर आणि अन्य फुलांची आवक वाढली आहे. आवक चांगली होत असून उद्या आणखी मागणी वाढेल.
अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फूलबाजार आडते असोसिएशनचे, मार्केटयार्ड.
फूलबाजारातील फुलांचे दर
झेंडू किलोला ३० ते ७० रुपये, गुलछडी ३०० ते ५०० रुपये, अॅष्टर गड्डी ५० ते ७० रुपये, सुटा अॅष्टर २०० ते २५० रुपये, शेवंती ५० ते ३०० रुपये, गुलाबाची गड्डी ४० ते ६० रुपये, गुलछडी काडी ५० ते १०० रुपये, डच गुलाबाचे २० नग ८० ते १५० रुपये आणि जर्बेरा ५० ते १०० रुपये दराने उपलब्ध होते.
शिवनेरी रस्त्यावर वाहतूककोंडी
मार्केटयार्डातील फूलबाजारात खरेदीदारांची गर्दी झाल्याने शिवनेरी रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली. शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा झेंडू विक्रीसाठी मांडला होता. त्यात फुले वाहून आणणारे टेम्पो, रिक्षा आणि खरेदीदारांची वाहने दाखल झाल्याने कोंडीत भर पडली. भुसार बाजार आणि नेहरू रस्त्यावरही वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनतळावर जागा मिळत नसल्याने नागरिकांना वाहने लावण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. कोंडीतून वाट काढत नागरिकांनी फुलांची खरेदी केली.




























































