
पैसे दिले नाही म्हणून मुलाने ग्राइंडर मशीनने वडिलांचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना रामनगर परिसरात घडली आहे. मोहनलाल परमार असे मृताचे नाव असून ते व्यापारी होते. पालघर पोलिसांनी अवघ्या तासाभरात नराधम मुलगा मुकेश परमार याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पालघर पूर्वेतील रामनगर परिसरात राहणारे मोहनलाल यांना तीन मुले आहेत. तसेच त्यांचे दादर येथे दुकान आहे. यातील दोन मुले दुकानात होती. तर एक मुलगा मुकेश हा मोहनलाल यांच्या घरात होता. दुकानात असलेल्या मुलाने वडिलांना अनेकदा फोन केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्याने पालघरमधील चुलत भावाला घरी जाऊन पाहण्यास सांगितले. तो घरी गेला असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मोहनलाल पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्याने तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी
मुकेश परमार हा कोणतेही काम करत नव्हता. त्याला गाडी घ्यायची होती. त्यामुळे तो वडिलांकडे पैशांची मागणी करत होता. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरून मुकेशने ग्राइंडर मशीनने वडिलांचा गळा चिरून हत्या केली. मोहनलाल यांची पत्नी काही दिवसांपूर्वीच गावी गेली होती. घटनेच्या दिवशी घरात वडील आणि आरोपी मुलगा हे दोघेच होते अशी माहिती पोलिसांनी दिली.




























































