
ठाणे जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला आहे. गाव-पाड्यांवर बिबट्यांचे मानवी वस्तीत शिरून हल्ले होत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या वावरावर आता एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वॉच राहणार असून त्यासाठी वनविभागाने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. त्याशिवाय गावपातळीवर दक्षता पथके स्थापन केली असून पिंजऱ्यांचीही व्यवस्था केली असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनखाते आता दक्ष झाल्याने बिबट्यांचे होणारे हल्ले थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वनविभागाने विशेष काळजी घेऊन सॅटेलाईट तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय घेतल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, बिबट्या वस्तीत शिरण्याचे संभाव्य हॉट स्पॉट लक्षात घेऊन त्या ठिकाणी अलर्ट यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक सावध होतील.
तत्काळ यंत्रणा कार्यान्वित होणार
बिबट्याचा वावर कुठे होतो तसेच कुठे होण्याची शक्यता आहे याचा अभ्यास करून दक्षता पथके स्थापन केली असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली. बिबट्याचा वावर विशिष्ट ठिकाणी होत असल्याचे वनविभागाला लक्षात येताच सॅटेलाईट व एआयच्या मदतीनेत तत्काळ यंत्रणा कार्यान्वित होऊन नागरिक दक्ष होतील, असे नाईक यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितले.




























































