
गावाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी आणि त्यातून उभारली जाणारी बीज यंत्रणा नेमकी कुणाच्या सोयीसाठी, असा सवाल रोहे तालुक्यातील एका घटनेने निर्माण झाला आहे. तालुक्यातील विठ्ठलवाडी गावासाठी मंजूर झालेला विद्युत डीपी (रोहित्र) थेट खासगी फार्महाउसच्या आवारातच बसवण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर धडक देत जाब विचारला. हा डीपी आमच्या गावात बसला पाहिजे, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली. महावितरण कर्मचाऱ्यांनी तो डीपी फार्महाउसच्या गेटसमोर हलवण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न गावकऱ्यांनी हाणून पाडला. अखेर ग्रामस्थांच्या आक्षेपानंतर हे काम थांबवण्यात आले.
रोहा तालुक्यातील चिंचवलीतर्फे अतोणे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे विठ्ठलवाडीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ९ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र गावासाठी मंजूर झालेली डीपी गावाच्या वेशीवरील एका खासगी फार्महाउसच्या आवारात उभारण्यात आल्याचे समोर आले. सरकारी निधीतून उभारण्यात येणारी वीज यंत्रणा खासगी मालमत्तेत का बसवली, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
यावेळी बिनधास्त धानावडे, रमेश कदम, नारायण शिंदे, दिलीप गायकवाड, भास्कर चोरगे, शशांक निंबाळकर, शंकर वांद्रे यांच्यासह महिला मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म्हणे गावात जागा उपलब्ध नाही
> याबाबत महावितरणचे रोहा येथील उपअभियंता जतीन पाटील यांनी सांगितले, ‘विद्युत डीपी उभारण्याच्या कामाला जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी मिळाली आहे. गावात जागा उपलब्ध नसल्यामुळे फार्महाउसच्या बाहेर डीपी उभारण्याचे नियोजन होते. सध्या काम थांबवण्यात आले असून गावात जागा उपलब्ध झाल्यानंतर तातडीने डीपी बसवण्याचे काम हाती घेण्यात येईल.’





























































