400 कोटींचा भूखंड कवडीमोल भावाने खासगी विकासकाला; काँग्रेसचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेने वरळीतील भूखंड पुनर्विकासासाठी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव येत्या सुधार समितीत मंजुरीसाठी येणार आहे. पालिका प्रशासनाने हा मोक्याचा भूखंड कवडीमोल भावाने खासगी विकासकाला देण्याचा घाट घातला असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी केला आहे.

जी/दक्षिण विभागातील भूकर क्रमांक 903 येथील खन्ना कन्स्ट्रक्शन हाऊस कमर्शिअल प्रीमायसेस सहकारी संस्था मर्यादित या नावाने ओळखल्या जाणाऱया महापालिकेच्या भाडेकरू मालमत्तेचा 33/7 अन्वये पुनर्विकास करण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. ही तब्बल 3108 चौरस मीटरची जागा आहे. काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला असून तो तातडीने रद्द करण्याची मागणी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.

ही तर भूखंडाची प्रत्यक्ष विक्री

या भूखंडाचे खुल्या बाजारातील मूल्य सुमारे 400 कोटी रुपये असताना रेडीरेकनरचा दर लावून ती अवघ्या 56 कोटी रुपयांत पदरात पाडली जात असल्यामुळे पालिकेच्या तिजोरीला 344 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. तसेच 60 वर्षांच्या भाडेपट्टय़ाच्या नावाखाली ही प्रत्यक्षात भूखंडाची विक्रीच असल्याचा आरोप आझमी यांनी केला.