
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर गायक मिका सिंगने मुंबईतील सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे. ‘मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहर आहे’, असे आपण नेहमी म्हणायचो. मात्र, आता शहरातील सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत मिका सिंगने सरकारला या घटनेची गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले आहे.
मिका सिंगने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आपली चिंता व्यक्त केली. टायगर श्रॉफसोबत आज जे घडले, ते उद्या इतर कोणासोबतही घडू शकते, असे म्हणत त्याने सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्याने म्हटले आहे. मिका सिंगने व्हिडिओमध्ये मुंबईतील सुरक्षेबाबतचा आपला पूर्वीचा अनुभव सांगितला. मुंबईत लोक रात्री उशिरापर्यंत काम करतात, पहाटे सहा वाजेपर्यंतही आपापल्या कामात व्यस्त असतात आणि रात्रीच्या वेळीही न घाबरता बाहेर फिरू शकतात, असे आपण अनेकदा सांगायचो, असे तो म्हणाला.
मात्र, टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे त्याला या सुरक्षिततेबाबत पुन्हा विचार करावा लागत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात अशी घटना घडणे चिंताजनक असल्याचे त्याने नमूद केले. मिका सिंगने सरकारला हात जोडून विनंती करत या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी ठोस कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेची खात्री द्यावी, अशी भूमिका त्याने मांडली.
आपण आपल्या शहरातील रस्त्यांवर बाहेर पडायलाही का घाबरावे? असा सवाल करत मिकाने मुंबईतील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. मुंबईसारख्या शहरात नागरिकांना दिवसा आणि रात्रीही सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे, असे त्याने म्हटले. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे.




























































