
चोरीला गेलेले सोन्याचे दागिने आणि हरवलेले मोबाईल पुन्हा मिळणे अनेकांसाठी अशक्यप्राय ठरते. मात्र उल्हासनगर परिमंडळातील आठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्तिक प्रभावी तपासामुळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने चोरीला गेलेला 20 लाख 66 हजारांच्या मुद्देमालाचा छडा लागला. शनिवारी उल्हासनगरातील टाऊन हॉलमध्ये मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सोन्याचे दागिने आणि हरवलेले 82 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड, मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
चंद्रहार गोडसे, हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले, बदलापूर पूर्व ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील, बदलापूर पश्चिम ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, अंबरनाथ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, शिवाजीनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेताना आधुनिक तंत्रज्ञान, तांत्रिक विश्लेषण आणि तपासातील कौशल्याचा प्रभावी वापर केला.
समाधान आणि आनंद
कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी लक्षवेधी कामगिरी करत गहाळ झालेले तसेच चोरीला गेलेले जवळपास 50 महागडे मोबाईल फोन शोधून काढले आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेले हे मोबाईल संबंधित नागरिकांना सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. अनेक दिवसांपासून हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला.


























































