
शिळोशी वाडीतील गावकऱ्यांनी एकत्र येत वनराई बंधारा बांधून गावात गंगा आणली आहे. बंधारा तयार करून पाणी अडवल्यामुळे गावाचा पाणी प्रश्न कायमचा मिटला आहे. हंडाभर पाण्यासाठी होणारी ग्रामस्थांची पायपीट थांबली आहे. ग्रामस्थांनी हातात फावडे, कोयता, टिकाव, पहार घेऊन स्वयंस्फूर्तीने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पावसाळ्यानंतर वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुसरवण्यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरतात. या बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावण्यास, जमिनीतील ओलावा टिकवण्यास आणि स्थानिक जलसंधारणाला हातभार लागण्यास मदत होणार आहे. पाण्याचे महत्व ओळखून त्याचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. शिळोशीवाडीतील ग्रामस्थांनी एकजुटीची ताकद दाखवत लोकसहभागातून वनराई बंधारा उभारून वाहून जाणारे पाणी अडवून ते गावाच्या उपयोगासाठी वळवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.
रिकाम्या सिमेंटच्या बॅगमध्ये माती भरली
शिळोशी गावकऱ्यांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पायपीट करून महिलांना पाणी आणावे लागत होते. या समस्येवर तोडगा काढत गावकऱ्यांनी रिकाम्या सिमेंटच्या बॅगमध्ये माती भरून बंधारा बांधला. या बंधाऱ्यामुळे अनेक फायदे गावातील लोकांना होणार आहेत. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे सुहास रणवरे, ग्रामपंचायत सदस्य महादेव वाघमारे, पोलीस पाटील राजू पवार यांच्यासह वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.



























































