सत्तेत नसल्यावर देवेंद्र फडणवीस, अमित शहा देखील पक्ष बदलतील, संजय राऊत यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

”सत्ता सर्वकाही करते. आमच्याकडे सरकार येऊ द्या मग कळेल तुमचे किती आमदार, खासदार तुमच्यासोबत राहतात ते. सत्तेत नसल्यावर देवेंद्र फडणवीस, अमित शहा देखील पक्ष बदलतील”, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मुंबईत पत्रकारासोबत संवाद साधताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

”अमित शहा सारखा माफिया गृहमंत्री जो साबरमतीमध्ये गुंड व अतिरेकी पोसतो आणि त्या गुंडांच्या मदतीने राज्य करण्याचा प्रयत्न करतो. अशा गृहमंत्र्यासोबत आमची टक्कर आहे. फडणवीस जर सभ्य असतील तर त्यांनी अशा माफिया गृहमंत्र्यांबाबत बोलू नये त्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल. या देशात जी लढाई सुरू आहे ती या माफियाविरोधात आहे. आमच्याकडे सरकार येऊ द्या मग कळेल तुमचे किती आमदार खासदार राहतात ते. कशी पळापळ होते. सत्ता सर्वकाही करते. जो सत्तेचा वापर बेकायदेशीरपणे करतात त्यांना हे सहज शक्य असतात. आम्ही लोकशाही मानणारे लोकं आहोत. सत्ता हातात नसल्यावर देवेंद्र फडणवीस, अमित शहा देखील पक्ष बदलतील”, असे संजय राऊत म्हणाले.

”अनेक राज्यात या गँगस्टर टोळीचा जो प्रमुख आहे तो पोलिसांना हवाय. पण अमित शहा त्याला साबरमतीतून बाहेर काढू देत नाहीत. ते त्यांना संरक्षण देतात. यासाठी फडणवीस काही काही प्रयत्न करणार आहेत का? महाराष्ट्राच्या राजधानीत एका फिल्म कलाकारावर हल्ला होतो, या मुंबईत त्यांच्या मर्जीतले बिल्डर एसआरए राज चालवतायत यावर मुख्यमंत्री कधी गांभिर्याने बोलणार आहेत का? इथे वेगळ्या प्रकारचे लॉरेन बिष्णोई त्यांनी देखील पाळले आहेत. माफिया डॉन देखील त्यांनी पाळले आहेत. त्यामुळे बाहेर येऊन जर कुणी गोळीबार करत असतील तर त्याला जबाबदार हे राज्य सरकार आहे. पूर्णेकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांना किती वेळ लागला या प्रकरणात लक्ष घालायला. आरोपी थेट मिनाक्षी शिंद व राजेंद्र शिंदेंसोबत दिसत आहेत. हेच जर दुसरं कुठलं प्रकरण असतं तर एवढ्याला त्या लोकांना अटक झाली असती. आरोपींना वाचवण्याचं काम गृहखातचं करत. हे जे जंगल रेजिम आहे ते उलथवून टाकणं ही देशाची गरज आहे. उद्याच्या दसऱ्या मेळाव्यातून त्यासाठी एल्गार पुकारणार”, असे संजय राऊत म्हणाले

”शिवसेना आता सिनियर सिटीजन झाली आहे. आम्ही प्रगल्भ झालो आहे. उद्या रेजिम चेंजसाठी एल्गार पुकारू. साठ वर्ष जी आहेत त्यात शिवेसनेनं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक चढउतार, जयपराजय पाहिले. अनेक दुष्ट लोकांशी सामना केला. संघर्ष सुरू आहे. या सगळ्या प्रसंगातून आम्ही साठ वर्षांचा प्रसंग पाहिला. आता ही लढाई न्यायालयात व जनतेच्या न्यायालयत अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे उद्याचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे”, असेही त्यांनी सांगितले.