
माणकिवली, अजरुण आणि डोळवली या गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरण्यासाठी आलेल्या टोळीला ग्रामस्थांनी घेरल्यामुळे त्यांचा ट्रान्सफॉर्मर चोरीचा डाव उधळला गेला. मोठ्या संख्येने गावकरी डीपीजवळ जमा झाल्यामुळे चोप बसण्याच्या भीतीने चोरट्यांनी पळ काढला.
शनिवारी रात्री गावातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी किशोर लाले हे पंप हाऊसची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी ट्रान्सफॉर्मरजवळ अंधारात कोणीतरी संशयास्पद हालचाली करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ग्रामस्थांना याची माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी ट्रान्सफॉर्मरच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.



























































