देवदर्शनाहून परतत असताना भीषण अपघात; भरधाव ट्रकची स्कॉर्पिओला धडक, चौघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रयागराज-वाराणसी महामार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने स्कॉर्पिओला धडक दिल्याने अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात स्कॉर्पिओचाही चक्काचूर झाला. मिर्झामुराद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रूपापूर ओव्हरब्रिजवर हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, स्कॉर्पिओमधील प्रवासी मिर्झापूर येथील विंध्यवासिनी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर ते काशीला परत येत होते. यादरम्यान सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 19 वरील मिर्झामुराद येथील रूपापूर ओव्हरब्रिजजवळ हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, स्कॉर्पिओ रस्त्यावर उभी असताना मागून येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली.

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अपघातप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.