
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाला. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ माजली असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेता प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
”मुंबईसह महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झालं आहे. बाबा सिद्दीकींची हत्या झाली, सलमान खानवर फायरिंग झाली, ठाण्यात पूर्णेकरांवर गोळ्या झाडून हत्या झाली. मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर इथे अशा प्रकारच्या हत्या, गोळीबारांचे सत्र सुरू आहे. या राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री हवं असं आम्ही सांगत आलोय. पण राज्याचे गृहमंत्री हे गृहखातं त्यांच्या विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवायला, विरोधकांना तुरुंगात टाकायला वापरत आहेत. त्यामुळे गुंड टोळ्या मोकाट आहेत. हे जंगलराज संपवण्यासाठी आम्ही आवाहन करतोय. हे राज्य यांना चालवता येत नाही. रेजिम चेंजचा विषय सुरुच आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याचा विचार राज्यपालांनी करावी”, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
”येत्या काळात याच गँगचा वापर करून हे लोकं राजकीय विरोधकांवर हल्ले घडवून आणतील. शहा फडणवीसांना आता कायद्याचे भय राहिलेले नाही. त्यांना कसलीच भिती नाही. याच गँगचा वापर करून सत्ताधारी त्यांच्या विरोधकांवर हल्ले घडवून आणतील. कायद्याची भीती आता संपली आहे. कायद्याची, न्यायालयाची, पोलिसांची भीती आता उरलेलली नाही. गँग आणि गृहमंत्रालय यांची मिलीभगत सुरू आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
रस्त्यावर जायला देखील आता भीती वाटते. कुठून गोळीबार होईल, कोयत्याचे वार होतील सांगता येत नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांना यबाबत काही चिंता वाटते का? काल उपमुख्यमंत्री शिंदे टायगर श्रॉफच्या घरी गेले. ते रडायचेच बाकी होते तिथे. पण हेच शिंदे ठाण्यात त्यांच्या घराजवळच हत्या झालेल्या पूर्णेकरांच्या घरी ते गेले नाही. तिथे त्यांना जावसं वाटलं नाही. बॉलिवूड, उ्दयोपतींवर गोळ्या चालवल्या जातात त्यांच्या सुरक्षेची यांना चिंता आहे. त्यांना आता झेड प्लस सुरक्षा दिली जाईल. पण पूर्णेकरांच्या हत्येनंतर हे उपमुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी देखील गेलेले नाही. खरे आरोपी पकडले जावेत यासाठी देखील त्यांनी सूचना दिल्या नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.
विरोधकांनी मागे वळून बघितलं पाहिजे या मुख्यमंत्र्यांच्या टिकेला देखील संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ”मुख्यमंत्री आता तुम्ही आहात ना. मागचं काय सांगता? पन्नास वर्षांपूर्वी साठ वर्षांपूर्वी झालं हे काय सांगता. आताचं बोला, कालचं बोला. मनसुख हिरेनचे मारेकरी तुरुंगात आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्वास्थ बिघडलं आहे का? तुमच्या राज्यात रोज खून पडतायत त्यावर प्रश्न विचारतो म्हणून आम्ही प्रश्न विचारतोय. म्हणून रेजिम चेंज करायचे आहे. कारण यांचा गजनी झालाय. यांना कालचं आठवत नाही. यांना सकाळचं आठवत नाहीये. यांचा मेंदू बधिर झालाय. हे निर्घृण मनाने काम करतायत. मोदी अजून नेहरूंच्या काळात अडकलेयत. अमित शहा राजीव गांधींच्या काळात अडकलेयत. मग तुम्ही 12 वर्ष काय करताय? ५ वर्ष कुणाचं राज्य आहे महाराष्ट्रात? ज्ञानेश कुमारने तुम्हाला निवडून दिलं आहे ना? हे लोकांचं सरकार नाही तर ज्ञानूचं सरकार आहे. हे ज्ञानेश कुमारच्या लायकीप्रमाणेच सरकार आहे. आताचं बोला ना. काल झालेल्या प्रकारावर बोला. रोज गोळीबार होतायत, उद्योगपतीचे अपहरण होतेय. त्यावर बोला. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. काही काळ तरी राहणार आहात. एप्रिल नंतर या राज्यात काय होणार ते सांगता येणार नाही”, असेही ते म्हणाले.



























































