
वाढदिवसाच्या दिखाऊ उत्सवी आनंदाला छेद देत कल्याणमधील एमकेएस वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय वाघ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. केक कापून वाढदिवसाचा आनंद काही क्षणांत संपतो. मात्र मुलांच्या हाती दिलेले पुस्तक त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. याच हेतूने त्यांनी अनोखा पुस्तक यज्ञ करून विद्यार्थ्यांना 400 प्रेरणादायी ग्रंथ भेट दिले.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मुलांमध्ये वाचनाची सवय टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडणे त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करणे आणि वाचनातून विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी प्राचार्य वाघ यांनी वाढदिवसानिमित्त 50 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांची 400 प्रेरणादायी पुस्तके देण्याचा निर्णय घेतला.
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 12 मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, खडकपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण बाखले, महापालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे, एमकेएस चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव परमजितसिंग सैनी, माजी नगरसेविका पुष्पा भोईर, शाळेच्या मुख्याध्यापिका सपना पाटील आदी उपस्थित होते.
ध्येय निश्चितीसाठी प्रेरणा
प्रेरणादायी पुस्तके ही केवळ माहिती मिळवण्याचे साधन नसून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करणारे माध्यम आहे. संघर्षातून मार्ग कसा काढावा, अपयशातून शिकून पुन्हा उभे कसे राहावे, ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न कसे करावेत याची शिकवण पुस्तकांमधून मिळणार आहे.




























































