
पाण्याअभावी शेतातील पिकं करपू लागली आहेत. विहिरी, नाले आणि डबक्यांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. अशा भीषण परिस्थितीत आपल्या शेतातील पिकं वाचवण्यासाठी दोन वृद्ध महिला जीवाचा आटापिटा करत आहेत. ना मोटारपंप, ना सिंचनाची कोणतीही सुविधा नसताना नाल्यात खड्डा खोदून साचलेलं पाणी गोळा करायचं आणि मोटारपंपाला जोडल्या जाणाऱ्या पाइपच्या साहाय्याने ते पाणी शेतापर्यंत पोहोचवायचं असा हा त्यांचा संघर्ष सुरू आहे.
पाण्याअभावी शेतातील पिकं करपू लागली आहेत. विहिरी, नाले आणि डबक्यांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. अशा भीषण परिस्थितीत आपल्या शेतातील पिकं वाचवण्यासाठी चंद्रपूरमधील दोन वृद्ध महिला जीवाचा आटापिटा करत आहेत. https://t.co/0r1bvdyDYn
— Saamana Online (@SaamanaOnline) October 19, 2026
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा गावात समोर आलेलं हे चित्र काळजाला चटका लावणारं आहे. दोन वृद्ध महिलांचा एवढा आटापिटा करूनही पिक वाचतील की नाही, याची शाश्वती नाही. मात्र, डोळ्यांदेखत कष्टाने उभं केलेलं पीक करपताना पाहायचं तरी कसं, या एकाच आशेने या दोघींची धडपड सुरू आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल ठरत असताना, या दोन वृद्ध महिलांचा संघर्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती अधोरेखित करणारा आहे.





























































