
जपानमधील नागोया येथे सुरू झालेल्या आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये हिंदुस्थानने पहिल्याच दिवशी नेमबाजीमध्ये दोन पदकांची कमाई केली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल एसएच1 प्रकारात मोना अग्रवालने आशियाई विक्रमासह सुवर्णपदक, तर अवनी लेखराने रौप्यपदक पटकावले. दुसरीकडे दृष्टिहीन ज्युदोपटू कोकिलाने अंतिम फेरीत धडक मारत हिंदुस्थानसाठी आणखी एका पदक निश्चित केले आहे.
राजस्थानच्या मोना अग्रवालने अंतिम फेरीत 250.0 गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिची सहकारी आणि दोन वेळची पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखराने 249.6 गुणांसह रौप्यपदक मिळवले. मोनाने अवनीला अवघ्या 0.4 गुणांनी मागे टाकले. दक्षिण कोरियाच्या युनरी लीने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. अंतिम शॉटपूर्वी मोनाची अवनीवर केवळ 0.1 गुणांची आघाडी होती. त्यामुळे शेवटच्या शॉटपर्यंत दोघींमध्ये चुरस पाहायला मिळाली.
कोण आहे मोना?
सीकर येथे जन्मलेल्या मोनाला वयाच्या नवव्या महिन्यात पोलिओ झाला होता. त्यामुळे तिच्या दोन्ही पायांवर परिणाम झाला. नेमबाजीपूर्वी तिने पॅरा-अॅथलेटिक्स, पॅरा-पॉवरलिफ्टिंग आणि सिटिंग व्हॉलीबॉलमध्येही सहभाग घेतला. 2019 मध्ये राजस्थानच्या महिला सिटिंग व्हॉलीबॉल संघाचे नेतृत्व करत तिने संघाला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. डिसेंबर 2021 मध्ये तिने रायफल नेमबाजीला सुरुवात केली. त्यानंतर जागतिक स्पर्धांमध्येही तिने पदके जिंकली.
अपघातात दुखापात झाली अन्
दुसरीकडे अवनी लेखराला 2012 मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी झालेल्या कार अपघातात मणक्याला दुखापत झाली होती. अभिनव बिंद्राच्या आत्मचरित्रातून प्रेरणा घेऊन तिने 2015 मध्ये नेमबाजी सुरू केली. त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली छाप उमटवली. आता तिने रौप्यपदक जिंकत कारकिर्दीत मैलाचा टप्पा गाठला आहे.




























































