Ecuador Priest Death: चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना अचानक कोसळला क्रूस, दुर्दैवी घटनेत फादरचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना अचानक डोक्यात क्रूस पडल्याने पादरींचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना इक्वाडोरच्या ग्वायाकिल शहरातील ‘अवर लेडी ऑफ पर्पेचुअल हेल्प’ चर्चमध्ये घडली. फादर पैट्रिक अल्फ्रोडो सांचेज मोलिनारी असे त्यांचे नाव आहे. सांचेझ हे ‘कॉन्ग्रेगेशन ऑफ द मोस्ट होली रिडीमर’ नावाच्या रोमन कॅथोलिक धार्मिक पंथाचे सदस्य होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.

फादर पॅट्रिसिओ अल्फ्रेडो सांचेझ मोलिनारी त्या चर्चमध्ये सेवा देत होते. प्रार्थना सभा सुरू असतानाचा संपूर्ण कार्यक्रम सोशल मीडियावर लाईव्ह केला जात होता. सभा सुरू होऊन सुमारे 20 ते 25 मिनिटे झाली असताना, पादरी वेदीवर उभे राहून उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी अचानक त्यांच्या मागच्या भिंतीवर लावलेला जड लाकडी क्रूस अचानक निखळून थेट त्यांच्या डोक्यावर आणि अंगावर कोसळला. अपघाताच्या काही क्षणांपूर्वीच धर्मगुरूंनी मृत्यूविषयी भाष्य केले होते.

ही संपूर्ण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अचानक क्रूस पादरींच्या अंगावर पडताना आणि उपस्थित भाविक मदतीसाठी धावताना दिसत आहेत. दरम्यान या घटनेनंतर वैद्यकीय पथकाला तातडीने पादरींच्या मदतीसाठी बोलवण्यात आले. मात्र त्यापूर्वीच पादरींचा मृत्यू झाला होता.

ग्वायाकिलच्या आर्कडायोसिपने अधिकृत निवेदनाद्वारे फादर सांचेझ मोलिनारी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. चर्च प्रशासनाने आणि भाविकांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.