12 हजार फूट उंचीवर दरवाजा उघडला, एअर अ‍ॅम्बुलन्सचे बांगलादेशात आपत्कालीन लँडिंग; हिंदुस्थानी रुग्णाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगरतळाहून कोलकात्याला चाललेल्या एअर अ‍ॅम्बुलन्सचा 12 हजार फूट उंचीवर असताना दरवाजा उघडल्याने ढाका येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान विमानतळावर उतरताच महिला रुग्णाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. विमानातील अन्य सहा जण सुखरुप आहेत.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, एसकेबी इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडची बीचक्राफ्ट किंग एअर C90A या एअर अ‍ॅम्बुलन्सने आगतळाहून 56 वर्षीय महिला रुग्णाला कोलकाता येथे नेण्यात येत होते. विमानात दोन पायलट, एक डॉक्टर, एक पॅरामेडिक, रुग्ण आणि दोन परिचारिका यांच्यासह एकूण सात जण होते. 12,000 फूट उंचीवर असतानाच तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा दरवाजा अंशतः उघडला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वैमानिकाने बांगलादेशातील ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली. आंतरराष्ट्रीय लँडिंगची पूर्वपरवानगी नसतानाही बांगलादेशी अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून विमानाला तात्काळ उतरण्याची परवानगी दिली आणि सर्वतोपरी मदत केली.

विमान उतरताच गंभीर आजारी असलेल्या अंजना भौमिक यांना कुर्मिटोला स्पेशलाइज्ड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू तांत्रिक बिघाडामुळे झाला की गंभीर आजारामुळे याची चौकशी सुरू आहे.