
भ्रष्टाचार, दडपशाही आणि क्रूर राजवटीच्या विरोधात अल्बानियात आज भयंकर उद्रेक झाला. पंतप्रधान इदी रामा यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या संतप्त जनतेने अल्बानियात अक्षरशः हाहाकार माजवला. भ्रष्ट सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत देशाचे सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले. सरकारी इमारतींना आगी लावल्या आणि संसदेवर पेट्रोल बॉम्ब टाकले.
अल्बानियातील सोशॅलिस्ट पार्टीच्या सरकारविरोधात गेल्या सात दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. बेरोजगारी, महाग शिक्षण, घसरलेला शैक्षणिक दर्जा आणि सर्वच क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेले पंतप्रधान आणि शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. त्यासाठी शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर सतत निदर्शने सुरू आहेत. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून पोलिसांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यातून आज मोठा उद्रेक झाला.
अल्बानियाची राजधानी तिराना येथे आंदोलक आणि दंगल नियंत्रण पथकामध्ये संघर्ष उडाला. पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला. त्यातून आंदोलन चिघळले आणि आंदोलकांनी सरकारी इमारती, बँका, कार्यालयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. सत्ताधारी पक्षाच्या मुख्यालयावर हल्ले चढवले. पोलीस ठाण्यांना आगी लावल्या. या हिंसाचारात पोलीस आणि पत्रकारांसह शेकडो लोक जखमी झाले आहेत.
इदी रामा यांचा राजीनाम्यास नकार
प्रचंड हिंसाचारानंतरही अल्बानियाचे पंतप्रधान ईदी रामा यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. हा विरोध सरकारला नसून युरोपीयन महासंघात सहभागी होण्यास आहे. यामागे परकीय शक्तींचे हितसंबंध आहेत, असा दावा रामा यांनी केला.































































