
सत्ताधाऱयांच्या बेबंदशाहीविरोधात देशात उठलेले जेन-झी वादळ आणि संविधानाच्या रक्षणासाठी जनतेने उभारलेल्या लढय़ाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा होत आहे. शिवतीर्थावर होणाऱया या विराट मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून अन्यायाविरोधात क्रांतीची मशालच धगधगणार आहे. लोकशाही रक्षणासाठी जेन-झींच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे नेमका काय संदेश देतात, महाराष्ट्र व देशहितासाठी कोणती शिवगर्जना करतात याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. यानिमित्ताने शिवसैनिकांमध्ये उदंड उत्साह असून मुंबईत मंगळवारी भगवे तुफान उसळणार आहे. मेळाव्याला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
‘एक पक्ष, एक मैदान आणि एक नेता’ अशी ख्याती लाभलेला शिवसेनेचा दसरा मेळावा राज्याच्या व देशाच्या राजकारणाला दिशा देणारा ठरतो. याच मेळाव्याच्या व्यासपीठावरून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी
अनेक वर्षे आपल्या परखड विचारांनी देशापुढील प्रश्नांना वाचा फोडली. अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. शिवसेनाप्रमुखांच्या ओजस्वी विचारांनी समृद्ध झालेली ही परंपरा आजही कायम आहे. महाराष्ट्राला सध्या दुष्काळाचा वेढा पडला असून कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र सरकार सुस्त आहे. मतचोरी आणि निवडणूक घोटाळ्यांमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. या अन्यायाविरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला असून दसरा मेळाव्यातून हा आवाज आणखी बुलंद होणार आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.
जेन-झींचे मोहोळ उठणार
तरुणांची संघटना अशी ओळख असलेल्या शिवसेनेचे जेन-झी पिढीलाही आकर्षण आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना सातत्याने लढत असते. गेल्या काही महिन्यांत पेपरफुटीच्या मुद्दय़ावर शिवसेनेने अनेक आंदोलने केली. त्यामुळे हजारो जेन-झी शिवसेनेशी जोडले गेले असून मेळाव्यात जेन-झींचे मोहोळ उठणार आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या आवाजातील टीझर सुपरहिट दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या ‘एक्स’ अकाऊंटवर जुन्या आठवणी जागवणारा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. शिवसेना गीताची धून आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धारदार आवाजातील हा टीझर तुफान हिट झाला आहे. अवघ्या काही तासांतच हा टीझर हजारो लोकांनी पाहिला असून शेअरही केला आहे.
शस्त्रपूजा, सोने वाटप, रावण दहन
शिवसेनेचा मेळावा हा हिंदू संस्कृती-परंपरेचे विराट दर्शन घडवणारा असतो. भगवे फेटे, भगवी वेशभूषा आणि भगवा ध्वज हाती घेऊन लाखो शिवसैनिक मेळाव्याला येत असल्याने संपूर्ण वातावरण भगवेमय असते. यंदाच्या मेळाव्यातही असेच वातावरण पाहायला मिळणार आहे. परंपरेप्रमाणे शिवतीर्थावर शस्त्रपूजा, सोने वाटप, रावण दहनही केले जाणार आहे. शिवसैनिकांनी वाजत-गाजत, गुलाल उधळत आणि शिस्तीने यावे, असे आवाहन शिवसेना भवनातून करण्यात आले आहे.
स्थळ – शिवतीर्थ, दादर
वेळ – सायंकाळी 5 वाजता




























































