
दांडिया खेळून परतणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या बाईकला रविवारी रात्री उशिरा सारसून-केंगोडी मार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील चालकाला धोकादायक वळण लक्षात न आल्याने बाईक थेट झाडावर आदळली. या भीषण अपघातामध्ये दोन विद्यार्थी जागीच ठार झाले असून तिघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. सुमित गिंभल (8 वी) आणि प्रीतम पोटिंदा (9 वी) अशी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे असून जखमी मुलांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.
जव्हारच्या हिरपाडा आश्रमशाळेत शिकणारे सुमित गिंभल, प्रीतम पोटिंदा, सुमित भोरे, रुस्तुम पोटिंदा व सुजित पोटिंदा हे पाच विद्यार्थी कोणाचीही परवानगी न घेता सारसून या गावात गरबा खेळण्यासाठी गेले होते. या मुलांनी एका दुकानदाराकडे ‘आम्हाला दवाखान्यात जायचे आहे’ असे खोटे सांगून बाईक मागितली. दवाखान्याचे कारण सांगितल्याने दुकानदाराने देखील लगेच आपली बाईक दिली. विशेष म्हणजे एका दुचाकीवरून पाचजण गरबा खेळण्यासाठी गेले. रात्री उशिरा पुन्हा आश्रमशाळेकडे परतण्यासाठी त्याच बाईकवरून सर्व विद्यार्थी निघाले.
मुलांची बाईक सारसून-केंगोडी रस्त्यावरून वेगात जात असताना एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बाईक थेट रस्त्यावर जाऊन आदळली. सर्वजण रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. आठवीत शिकणारा सुमित गिंभल व नववीमधील प्रीतम पोटिंदा याला प्रचंड जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमित भोरे, रुस्तुम पोटिंदा व सुजित पोटिंदा या तिघांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.



























































