
ऊसतोडीच्या कामासाठी आगाऊ घेतलेले पैसे परत देण्याची तयारी दर्शवूनही कामावर येण्यास नकार दिल्याच्या रागातून मोखाड्यातील कातकरी मजुरांचे अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांना डांबून ठेवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोपही या मजुरांनी केला आहे. मोखाडा पोलिसांच्या तत्परतेमुळे या पीडित मजुरांची सुटका करण्यात आली असून आरोपींवर वेठबिगारीसह विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोखाडा तालुक्यातील शेंड्याचीमेट येथील फणसपाडा येथे राहणारे देविदास निवृत्ती भोये आणि त्यांचा भाऊ नवनाथ यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील मालक म्हस्कू महारनवर याने ऊसतोडीच्या कामासाठी 2 लाख 85 हजार इतकी रक्कम आगाऊ दिली होती. मात्र काही कारणास्तव या कुटुंबाला कामावर जाणे शक्य नसल्याने त्यांनी कामावर येण्यास नकार देत घेतलेले पैसे परत देण्याची तयारी दर्शवली. मात्र याचा मालक म्हस्कू महारनवर याला भयंकर राग आला.
देविदास भोये हे बसस्टॉपवर उभे असताना एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या काही लोकांनी त्यांना बळजबरीने गाडीत कोंबले. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथून त्यांचा भाऊ नवनाथ यालाही गाडीत ओढून दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपींनी आमच्यावर अत्याचार करून आम्हाला कर्जत येथे जबरदस्तीने डांबून ठेवले, असा आरोप पीडित आदिवासी मजुरांनी केला आहे.




























































