
कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाने अवघ्या सहा महिन्यांत सुमारे 3.5 कोटी रुपयांचे, तर गणेशोत्सवाच्या काळात तब्बल 95 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि स्थानकाचे लक्षणीय उत्पन्न लक्षात घेता, येथे अधिक रेल्वेगाड्यांना थांबा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, चार महत्त्वाच्या साप्ताहिक एक्स्प्रेसना अद्याप थांबा मिळालेला नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
बांद्रा-मडगाव एक्स्प्रेस (10115/10116), श्री गंगानगर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस (16311/16312), अजमेर-एर्नाकुलम मरुसागर एक्स्प्रेस (12977/12978) आणि जबलपूर-कोईम्बतूर एक्स्प्रेस (02197/02198) या चारही गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शेखर निकम, आमदार प्रमोद जठार, पद्मश्री दादा इदाते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनीही पत्रव्यवहार केला आहे. तसेच, पद्मश्री गजानन माने यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा विषय मांडला होता.
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळवा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असून त्याला लवकरच यश मिळेल, असा विश्वास निसर्गरम्य चिपळूण/संगमेश्वर ग्रुपचे प्रमुख श्री संदेश जिमन यांनी व्यक्त केला आहे.




























































