
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार करणाऱ्या तिन्ही हल्लेखोरांना राजस्थानातील कोटा रेल्वे स्थानाकात अटक करण्यात आली. फुलसिंग नरेश (18), रेहान रहशुद्दीन (18) आणि ऋतिक मेहतो उर्फ रोशन (22) अशी त्यांची नावे असून यापैकी एक आरोपी ऋतिकचे नाव रॅपिडो बाईक टॅक्सी कंपनीशी जोडले जात आहे. त्यामुळे रॅपिडो कंपनीने यावर आपले अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
दोन दिवसांपूर्वीच 18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर तिन्ही हल्लोखोर मुंबईबाहेर पळाले होते. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा माग काढत दिल्ली, गुजरात, राजस्थान पोलिसांच्या मदतीने कोटा रेल्वे स्थानकावरून आरोपींना ताब्यात घेतले.
या अटकेनंतर आरोपी हृतिक कुमार हा रॅपिडोवर ड्रायव्हर म्हणून नोंदणीकृत असल्याचे समोर आले. यावर स्पष्टीकरण देताना रॅपिडो कंपनीने म्हटले आहे की, आरोपी हा 14 ऑक्टोबरपासून (गोळीबाराच्या घटनेच्या चार दिवस आधीपासून) रॅपिडो प्लॅटफॉर्मवर अजिबात सक्रिय नव्हता. ज्या दिवशी गोळीबार झाला त्या दिवशी आरोपीने रॅपिडोचा ड्रायव्हर म्हणून नव्हे, तर ग्राहक म्हणून रॅपिडो सेवेचा वापर केला होता, अशी माहितीही समोर आली आहे.
आरोपी हिृतिक हा मुळचा बिहारच्या बेगुसराईमधील रहिवाशी आहे. त्याने 12 वी पर्यंत शिक्षण घेतले असून दोन महिन्यांपूर्वीच तो मुंबईत आल्य़ाची माहिती इंडिया टुडेच्या वृत्तात दिली आहे.



























































