ज्ञानेश कुमार म्हणजे मोदी-शहांची बेंबी! तडाखेबंद! शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा तुफानी हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या देशाचे लक्ष लागलेला अस्सल शिवसेनेचा हीरक महोत्सवी, ऐतिहासिक आणि अतिविराट दसरा मेळावा आज शिवतीर्थावर झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवतीर्थावर गर्दीचे भगवे तुफान उसळले. मेळाव्याला उपस्थित अफाट जनसागराच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बेबंदशाहीला जोरदार तडाखे दिले. ‘धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतो. भीमनवार यांना रजेवर पाठवले जाते. पण ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला जात नाही. कारण, रावणाचा प्राण बेंबीत होता. ज्ञानेश कुमार ही मोदी-शहांची बेंबी आहे. त्या बेंबीचे रक्षण करण्यासाठी लाखोंचा फौजफाटा दिल्लीत आणला गेला आहे. पण हे फार काळ चालणार नाही. बारा वर्षे तुम्ही देशाला छळले. देशाची वाट लावली. त्याची फळे तुम्हाला भोगावीच लागतील,’ अशी गर्जनाच उद्धव ठाकरे यांनी केली. ‘आम्ही सत्ताही बदलणार आणि देशाला खऱ्या अर्थाने अच्छे दिनही दाखवणार, असे ठणकावतानाच, उद्याच्या सत्ताबदलासाठी जे रणकंदन होईल, त्यात शिवरायांचा महाराष्ट्र भवानी तलवारीसारखा तळपला पाहिजे,’ अशी साद उद्धव ठाकरे यांनी जनसमुदायाला घातली. उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाला शिवसैनिकांनी मुठी आवळून प्रतिसाद दिला आणि अवघे शिवतीर्थ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… उद्धव ठाकरे आगे बढो…’ या घोषणांनी दुमदुमून गेले.

दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर तुफान गर्दी उसळली. त्या गर्दीकडे चौफेर नजर फिरवत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.  शिवतीर्थावर आज भगवा माहोल आहे, हीच शिवसेनेची ओळख आहे आणि ही ओळख कुणीही चोरू शकत नाही, कितीही दरोडेखोर आले तरी शिवसेनेचा भगवा चोरू शकत नाहीत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. हाच पवित्र भगवा ध्वज पुन्हा एकदा केवळ महाराष्ट्राच्या विधानसभेवर नाही तर लाल किल्ल्यावरही फडकवायचा आहे, असे आवाहनही त्यांनी केले. जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला होता, जो भगवा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हाती दिला, तोच हा पवित्र भगवा आहे. हा पवित्र तेजस्वी भगवा आणि निशाणीचा झेंडा वेगळा ठेवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आजच्या दसरा मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा दसरा मेळावा विशेष आहे. यंदा शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रबोधनकारांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाचे शताब्दी वर्ष आहे आणि विशेष म्हणजे ज्या शिवाजी पार्कातून शिवसेनाप्रमुखांनी आपली शिवगर्जना पहिल्या प्रथम दिली, पहिला दसरा मेळावा याच शिवतीर्थावर झाला आणि या मैदानाचे नामकरण शिवाजी पार्क झाले त्यालाही आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत हा शुभ योगायोग आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांची अनेक वाक्ये आजही आपल्या हृदयावर कोरून ठेवलेली आहेत. ‘मेलेली मनं कधी क्रांती करू शकत नाही. जिवंत माणसासारखे वागा. मुडद्यासारखे कदापि वागू नका… ‘क्रांती ही मर्दाची असते. शांती ही मुडद्यांची असते,’ असे शिवसेनाप्रमुख सांगत. या वाक्यांची आठवण देत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘खुराडय़ातल्या कोंबडयांसारखं जिणं जगू नका. मालक जेव्हा कापण्यासाठी एखाद्या कोंबडीची मान पकडतो तेव्हा ती एकटीच कलकलाट करते. बाकीच्या कोंबडय़ा मालक जे दाणे टाकतो, ते टिपत बसतात आणि गलेलट्ठ होतात. त्यांना माहीत नसते, उद्या त्यांचीही मान जाणार आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारची सालटीच काढली. गेल्या वर्षी अतिवृष्टीत जमिनी खरडून गेल्या होत्या. घरेदोरे, भांडीकुंडी, वह्या पुस्तके वाहून गेली होती. लोकांचे आयुष्यच वाहून गेले होते. त्यावेळी सरकारने इतिहासातले सर्वात मोठे 31 हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले होते. ज्यांची जमीन खरडून गेली त्यांना साडेतीन लाख रुपये हेक्टरी जाहीर केले होते. ती मदत किती जणांना मिळाली? पीक विमा किती जणांना मिळाला? सात रुपये, अकरा रुपयांचा चेक देऊन शेतकऱ्यांची चेष्टा चालली होती, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

यंदाही दुष्काळ जाहीर केला. पण आतापर्यंत किती जणांना मदत मिळाली हे कोणालाच माहीत नाही. केंद्रीय पथक येऊन गेले. त्यांनी काय पाहिले? किती पंचनामे केले? नेमकी मदत कधी आणि किती येणार? कोणाला मिळणार? कोणालाच माहिती नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अमित शहा गुजरातमध्ये बोलतात की, गुजरात में हिंदी नही बोली जाती आणि तामीळनाडूमध्ये जाऊन नमस्कार करून सांगतात, माफ करो, मुझे तामिळ नही आती. लाचारांमुळे त्यांना सत्ता मिळाल्याने महाराष्ट्र म्हणजे लाचारांचा प्रदेश आहे असे त्यांना वाटत असेल. पण अजिबात नाही. भाजप मते चोरून सत्तेवरती आली आहे. हिंमत असेल तर बॅलेट पेपरने मग मतदान घेऊन बघा मग तुम्हाला तुमची जागा दाखवून देतो.   

संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मुंबई मिळवण्यासाठी गुजरातने पराकाष्ठा केली होती, पण मराठी माणूस ताठ मानेने उभा राहिला, रस्त्यावर उतरला आणि रक्त सांडले. म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आता भाजपला वाटते की शिवसेना संपवली की मुंबईचा घास गिळता येईल. पण अजगरासारखे तोंड मोठे करून गिळण्याचा प्रयत्न केलात तर मर्द मराठी माणूस तुमचे पोट फाडून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.

आजसुद्धा तिरंगा यात्रा काढणे हा गुन्हा ठरत असेल तर ’ले के रहेंगे आझादी’ या वाक्याचा अर्थ कसा काढायचा…तुम्हीच सांगा भागवतजी.

शेतकऱ्यांची पोरं मरताहेत आणि पंचतारांकित शेतकरी हेलिकॉप्टर उडवत फिरतोय

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती मांडताना परभरणीतील एका हृदयद्रावक घटनेचा दाखला दिला. परभणीतील झरी गावातील 14 वर्षीय युवराज मुधळ याने राहत्या घरात आईच्या साडीने गळफास घेतला. शाळेच्या सहलीसाठी नवीन कपडे हवे होते, पण सोयाबीन विकले नसल्याने पैसे आल्यावर कपडे घेऊ असे वडिलांनी सांगितले. त्या निराशेत युवराजने घरी कुणीही नसताना आत्महत्या केली. ज्या साडीमध्ये असताना आईला तो बिलगत होता, त्याच साडीने जीवन संपवले. पण त्या कुटुंबाकडे सरकारमधले कुणीही फिरकले नाही. गरीब शेतकऱ्याची पोरं अशी मरतायत, अन् दुसरीकडे ‘पंचतारांकित’ शेतकरी हेलिकॉप्टर उडवत फिरतायत, हे तुमचे थोतांड आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना चपराक लगावली.

…मग बरोबर, बसला ना दीपके मोदींच्या डोक्यावर

अयोध्येतील राम मंदिराच्या अनावरण सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजित मुहूर्त काढला होता. त्याचा उल्लेख यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला होता. तो धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर अचूक नेम धरला. मोदींनी काढलेला अभिजित मुहूर्त बरोबर ठरला, बसला ना दीपके त्यांच्या डोक्यावर, असा मिश्कील टोला त्यांनी लगावला.

संघाचा तिरंगा द्वेष आजही कायम आहे

जंतरमंतरवर तिरंगा फडकावणाऱ्या तरुणांवर मोदी सरकारने अत्याचार केले. तरुण मुले तिरंगा घेऊन जात असताना त्यांना पकडले गेले, हा तिरंग्याचा द्वेष आहे. स्वातंत्र्यानंतर काही वर्षे संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकत नव्हता अशी टीका होते, तो द्वेष आजही कायम आहे का? आजसुद्धा तिरंगा यात्रा करणे हा गुन्हा ठरत असेल, तर मग ‘लेके रहेंगे आजादी’ या शब्दाचा अर्थ नेमका कसा लावायचा? असा सवाल त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना केला.

हातात नाही काम, पण बोल जय श्रीराम. हे शिवसेनेचे हिंदुत्व नाही. हृदयात राम आणि हातात काम, हे शिवसेनेचे हिंदुत्व आहे. शिवसेना कट्टर देशाभिमानी आहे. आमचा रंग भगवा आहेच, पण कोणी देशभक्त मुसलमान असेल, त्याचा रंग हिरवा असेल. देशभक्त बौद्धांचा रंग निळा आहे. इतर कोणी देशभक्त असतील त्यांचा रंग पांढरा आहे. तिरंग्यामधले रंग वेगळे करण्याचे काम भाजप करत आहे. पण आपण सगळे मिळून हा तिरंगा आहे हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. तिरंग्यातील अनेकतेत एकता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

टायगरचे हल्लेखोर नाकाबंदीत कसे सापडले नाहीत?

टायगर श्रॉफवरील गोळीबारावरून उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, टायगरवर गोळीबार करणारे आरोपी पोलिसांनी तत्परतेने पकडले. सुदैवाने टायगर बचावला, पण गोळी वर्मी लागली असती आणि त्यानंतर गोळीबार करणारे गुंड पकडले गेले असते तर काय उपयोग होता? पोलीस असोत वा इतर संस्था असोत, सरकारने त्यांना फक्त भांडी घासायला सांगणे बाकी ठेवले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. नवरात्र असल्याने सर्वत्र नाकाबंदी होती, जरा कुठे खट्ट झाले तरी पोलीस लगेच संबंधिताला पोलीस ठाण्यात बोलवतात. मग टायगरला मारायला शस्त्र घेऊन येणारे गुंड त्यांना नाकाबंदीत कसे दिसले नाहीत, की त्यावेळेला त्यांच्या नाकामध्ये बोळे काsंबले होते, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते गुंड शस्त्रs घेऊन आले हे पोलिसांना आधीच कळायला हवे होते आणि तिकडेच त्यांना उडवायला हवे होते, मग महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे असे म्हणता आले असते, असा टोला त्यांनी लगावला. याच मुद्दय़ावरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. ‘टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यावर हे ‘चमको’ लगेच तिथे भेटायला गेले, पण शेतकऱ्याचे मरण बघायला कुणी जात नाही’ असे ते म्हणाले.

फडणवीसजी, हिंमत असेल तर बिष्णोईला खेचून आणा

टायगरवर गोळीबार करायला आलेले गुंड महाराष्ट्राच्या कुठल्या शहरातून आले होते, ते यूपी वगैरे येथून आले होते आणि त्यांना येताना पकडले नाही तर जाताना पकडले गेले. बिष्णोई साबरमती जेलमध्ये अमित शहांचा ढोकळा-फाफडा खात बसला आहे आणि त्याचे गुंड त्यांच्याकडे 70 हजार शूटर्स असल्याचा दावा करतात. फडणवीसजी, तुमच्यात जरा तरी हिंमत असेल तर जा साबरमतीला आणि तुमचा बाप तिकडे दिल्लीत बसलाय त्याच्यासमोर त्या बिष्णोईला खेचून इकडे आणून दाखवा, मग गप्पा मारा, असे उघड आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले.

बाबासाहेब, महात्मा फुलेंची पुस्तके अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा कट

उद्धव ठाकरे यांनी यावेळी एका अज्ञात ट्विटर हँडलवर आलेल्या पोस्टची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी जातीव्यवस्थेच्या विरोधात लिहिलेली पुस्तके म्हणजे विष आहे, ती अभ्यासक्रमातून काढून टाका असे त्यात म्हटले आहे. म्हणजे ती पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचे भाजपचे कारस्थान गुपचूपपणे सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावरून भाजपला देशात पुन्हा जातीव्यवस्था आणि चातुर्वर्ण्य आणायचेय, उच्च-नीच शूद्र-बिद्र सगळे आणायचेय, असा आरोप त्यांनी केला. ज्या घटनेचा आधार घेऊन भाजपा सत्तेची खुर्ची उबवतेय त्याच घटनाकारांनी दूर केलेल्या जातीव्यवस्थेकडे पुन्हा समाजाला नेत आहे, देशाचे स्वातंत्र्य नासवत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच ही पुस्तके तुम्ही अभ्यासक्रमातून काढून दाखवाच, असा इशाराही त्यांनी दिला. पहिला समाज सुधारावा लागतो आणि त्यानंतरच स्वातंत्र्य महत्त्वाचे असते असे ते पुढे म्हणाले.

राजालाच धर्माचा आश्रय घ्यावा लागतोय

प्रबोधनकार ठाकरे यांनी देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे असे पुस्तक लिहिले होते. शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वामध्ये वेगळे काय आहे असा विचार केला तेव्हा राजकारणाचा धर्म आणि धर्माचे राजकारण असे समोर आले. शिवसेनाप्रमुखांनी राजकारणामध्ये धर्म आणला, पण तो नुसता हिंदू धर्म नाही तर 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण हा तो महाराष्ट्र धर्म जो गाडगेबाबांना अपेक्षित होता. तो महाराष्ट्र धर्म जो कर्तव्याला कधी चुकत नाही, कर्तव्यापासून कधी पळत नाही. बाबरी पाडल्यानंतरही बाळासाहेबांनी देशातील हिंदूंना आधार दिला होता. तेच कडवट हिंदुत्व घेऊन शिवसेना पुढे चालली आहे आणि शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. आज धर्माचे राजकारण सुरू झाले आहे आणि राजालाच धर्माचा आश्रय घ्यावा लागतोय, अशी टीका त्यांनी केली.

तुम्ही हिंदुत्व नासवताय. हिंदुत्व बदनाम करताय. 12 वर्षे तुम्ही विश्वगुरू म्हणून बसलाय आणि अजूनही ‘हिंदू खतरे में है’ अशी आवई तुम्हाला का द्यावी लागते? मग नेमपं तुम्ही केलंत काय. ना हिंदूंना वाचवलं, ना देश पुढं नेलात. काहीच केलं नाही. असे तुम्ही पुचाट हिंदुत्ववादी. तुमच्यामुळे हिंदू धर्म सुरक्षित नाही. हिंदू धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे. तुम्ही नव्हता तेव्हापासून हा धर्म आहे आणि तुम्ही एप्रिलमध्ये जाणारच आहात. त्यानंतरही हिंदू धर्म राहील. तुम्ही हिंदू धर्माचा मक्ता नाही घेतलात.

शपथ घ्या, चांगले दिवस आणणार!

मोदी जे बोलले होते सुरुवातीला…अब देश बदल रहा है… हो, खरंच देश आज बदलतोय. देशाला आता जाग आली आहे. जसं ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक आहे तशी आता भारतमातेला जाग आलेली आहे. ही जाग आता कुणीही घालवू शकत नाही. आपण केवळ अच्छे दिन आयेंगे म्हणून चालणार नाही. सगळय़ांनी शपथ घेतली पाहिजे… होय, आम्ही चांगले दिवस आणणार.

उद्या सत्ताबदलाचे जे रणपंदन होणार आहे त्याच्यामध्ये हा शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा, प्रबोधनकारांचा, शूरवीरांचा, साधूसंतांचा महाराष्ट्र भवानी तलवारीसारखा तळपला पाहिजे आणि तो तळपेलच.

दुष्काळात तेरावा तसं हे सरकार!

ग्रामीण भागात अक्राळविक्राळ दुष्काळ आहे. सुदैवाने आपल्याला अजून त्याचे चटके, फटके बसलेले नाहीत. पण दुष्काळात तेरावा महिना म्हणतो तसं हे डबल इंजिनचं सरकार इथे बसले आहे. नुसत्या घोषणा करत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

गद्दारांना 50 खोके आणि शेतकऱ्यांना फक्त 5 हजार! कसलं हे सरकार?

मध्यंतरी ऑपरेशन टायगर केले. म्हणजे काय तर सहा गद्दार पह्डले. गद्दारांना पह्डण्यासाठी 50 खोके दिले आणि शेतकऱ्यांना 5 हजार. ही तुमची लायकी. ही तुमची दानत. खुर्ची टिकवण्यासाठी 50 कोटी आणि ज्याच्यामुळे तुमच्या पोटात दोन घास जातात त्याला 5 हजार रुपये देता, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

रुसू बाई रुसू, गावी जाऊन बसू!

मुंबईत पुन्हा संयुक्त महाराष्ट्रासारखी परिस्थिती आहे. संघाचे कोणीतरी भय्या जोशी मुंबईत येऊन म्हणाले, घाटकोपरची भाषा गुजराती आहे. अमित शहा म्हणाले, महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे. आमचे दाढी खाजवणारे सत्तालंपट तेव्हा शेपूट हलवत बसले होते. हे शेपूटघाले आम्हाला हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार शिकवणार? महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होतोय. शहरी नक्षलवादाचे पेंद्र म्हटले जातेय. कोणाला काही पडलेली नाही. शेपूटघाले आणि बूटचाटय़ांचे ‘रुसू बाई रुसू आणि गावी जाऊन बसू,’ हेच सुरू आहे, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

मैदानासाठी नेता आणि नेत्यासाठी मैदान

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि शिवाजी पार्कच्या नामकरणाचे शताब्दी वर्ष म्हणजे मैदानासाठी नेता आणि नेत्यासाठी मैदान हे एकाच वर्षी जन्माला आले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. सोन्यासारखे रहा, सोन्यासारखे तेजाने उजळून निघा आणि देशालासुद्धा परत एकदा ती झळाळी प्राप्त करून द्या, असे ते म्हणाले.

शिवरायांनी अफझलखानाला फाडला तेव्हा त्यांचं वय होतं 29. हाच अफझलखान शिवरायांना ‘पहाड का चूहा’ म्हणाला होता. शिवरायांनी त्याचा कसा कोथळा काढला हे जगजाहीर आहे. शिवरायांना चूहा म्हणणारा अफझलखान आणि आताच्या जेन-झींना झुरळ आणि दिमागी नक्षल म्हणणाऱ्या या सरकारमध्ये फरक तो काय?

नमो किसान योजनेच्या दोन हप्त्यांचे 4 हजार रुपये अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत आणि सरकार त्यांच्या तोंडावर 5 हजार रुपये फेकतेय. शेतकऱ्याला त्याच्या नुकसानभरपाईपोटी विम्याची रक्कम मिळावी म्हणून लावलेले निकषही सरकारने काढून टाकले, जेणेकरून नुकसानभरपाई देण्याची गरजच लागणार नाही, असे कारस्थानही त्यांनी उघड केले.

आंदोलक मुलांना गुराढोरासारखे मारले आणि तुम्ही सभ्यता शिकवताय?

आंदोलकांनी सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी मेळाव्यातील भाषणात केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘आंदोलनात सभ्यता पाहिजे असे भागवत म्हणतात. कोणी पाळायची आणि कोणी कोणाची काढायची? जेन-झी जेव्हा रस्त्यावर उतरले, तेव्हा तुमचे पोलीस लांडग्यासारखे तुटून पडले. कुणाचे कपडे फाडले. कुणाच्या झिंज्या खेचल्या. गुराढोरासारखे मारले. कालपरवा राहुल गांधींनी त्या मुलींना मीडियासमोर आणले. एकीचा चेहरा वाकडा झाला होता. तिच्या पोटात लाथा मारल्या. ठोसे मारले. भयानक अत्याचार केले. हे सगळे होत असताना निर्लज्ज सरकार ढेंगा वर करून बसले होते आणि तुम्ही आंदोलकांना सभ्यता शिकवताय,’ असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आसूड कडाडला

  1. मोदी-शहा 12 वर्षं तुम्ही देशाला छळ छळ छळलंय! त्याची फळं तुम्हाला चाखावी आणि भोगावीच लागतील.
  2. भाजपचा सगळय़ात मोठा घोटाळा… संभ्रम घोटाळा!
  3. विजयादशमीला सोनं लुटतात, मात्र या सरकारच्या काळात त्यांच्या उफराटय़ा कारभारात सोनं लुटणं तर दूरच, पण या सरकारने लोकशाहीच लुटली.
  4. मतचोरी होताना षंढांसारखं बघत बसायचं का? देशभरात 13 कोटी मतदारांना वगळण्यात आलंय. महाराष्ट्राच्या लोकसंख्येएवढय़ा लोकांची नावेच मतदार याद्यांमधून उडवली.
  5. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शहरी नक्षलवादाचे पेंद्र म्हणताना तुमची जीभ झडत कशी नाही?
  6. भाजपला तिरंग्यातील भगवा, हिरवा आणि पांढरा रंग वेगळा करायचा आहे. हे उधळून लावा. तिरंगा तिरंगाच राहणार!