
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल उत्तर प्रदेशातून खरेदी केले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग ऊर्फ पपलू यांनी 2021 मध्ये प्रत्येकी 15 हजाराला दोन पिस्तुले उत्तर प्रदेशातून खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस तपासातील माहितीनुसार संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली याचा उत्तर प्रदेशातील गावात जमिनीचा वाद होता तर अमित सिंग ऊर्फ पपलू याचेही यूपीतील गावात वाद होते. त्यामुळेच या दोघांनीही पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातूनच दोन पिस्तुले प्रत्येकी 15 हजाराला विकत घेतली होती, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. यातील एक पिस्तूल पोलिसांनी कर्नाळा अभयारण्यातून हस्तगत केले. मात्र दुसरे पिस्तूल अद्याप सापडलेले नाही. तसेच पूर्णेकर यांच्या हत्येसाठी वापरलेल्या तीन चॉपरचाही शोध लागला नसल्याने या शस्त्रांचा माग काढण्याचे आव्हान तपास पथकासमोर आहे.
आज राजेंद्र शिंदेंची चौकशी होणार
शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना बुधवारी पोलिसांनी पाचव्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत चार वेळा बोलावून पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांची एकूण 29 तास चौकशी केली आहे. त्यांना आरोपींच्या समोर बसवून ही चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा
पूर्णेकर यांच्या हत्येला 22 दिवस उलटून गेले तरी पोलीस मास्टरमाइंडला अटक करत नाहीत. त्यामुळे या हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी ठाण्यातील आगरी-कोळी भूमिपुत्रांच्या सर्व संघटनांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन केली. याबाबतचे निवेदन त्यांनी गणेश नाईक यांना दिले.



























































