
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या बहुचर्चित प्रकरणाला मोठे वळन मिळाले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही मुख्य आरोपींना बुधवारी पहाटे राजस्थानमधील कोटा येथून रस्ते मार्गाने मुंबईत आणण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबईत पोहोचताच पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या तिन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने जी.टी. रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पुढील सखोल चौकशीसाठी आरोपींना थेट मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाच्या (एईसी) कार्यालयात हलवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटली असून त्यात हरियाणातील सोनीपत येथील रेहान ऊर्फ सुक्का, मूळचा बिहारमधील बेगुसरायचा असलेला आणि सध्या मुंबईत वास्तव्य करणारा रितिक कुर्मी ऊर्फ रोशन आणि हरियाणातील फूल सिंग यांचा समावेश आहे. याआधी कोटा शहर पोलिसांनी तिन्ही आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना औपचारिकरीत्या अटक करून स्थानिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान आरोपींना मुंबईत घेऊन जाण्यासाठी ‘ट्रान्झिट रिमांड’ मंजूर केला, ज्यानंतर त्यांना आज मुंबईत आणण्यात आले.
दरम्यान, बुधवारी सकाळीच एडवोकेट अजिंक्य मिरगल मुंबईतील खंडणीविरोधी कक्षाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणात आपण आरोपींच्या वतीने बचाव पक्षाचे वकील म्हणून काम पाहणार असल्याची अधिकृत माहिती दिली. पोलीस आता या प्रकरणाचा आणखी उलगडा करण्यासाठी आरोपींची कसून चौकशी करत आहेत.





























































