पोलीस डायरी – गुजरात गुन्हेगारांचे आश्रयस्थान, बिष्णोईच्या ‘ताफ्यात’ मुस्लिम शूटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर रविवारी (18 ऑक्टोबर 2026 रोजी) सायंकाळी सातच्या सुमारास जुहू येथील पुष्पा पार्कजवळ तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला व दुचाकीवरून पळून गेले. मुंबई पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता गुन्ह्यात वापरलेली दुचाकी अंधेरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर आढळून आली.

अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात टायगर श्रॉफ व अन्य तीन जण जखमी झाले. गोळीबारानंतर कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीतील हरयाणाच्या पानिपतचा अनिल पंडित याने टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी एक ऑडिओ/व्हिडीओ क्लिप जारी करून घेतली आहे. आपल्या क्लिपमधील संभाषणात अनिल पंडित म्हणतो, ‘‘मी अनिल पंडित, माझे साथीदार हरमन संधू ऊर्फ अरमान संधू असे आम्ही दोघेजण टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेत आहोत.’’ सलमान खान काळवीट शिकारप्रकरणी जोपर्यंत बिष्णोई समाजाची माफी मागत नाही, तोपर्यंत टायगर श्रॉफने सलमान खानबरोबर काम करू नये,’’ असा इशाराही अनिल पंडितने आपल्या क्लिपमध्ये टायगर श्रॉफला दिला आहे.

टायगर श्रॉफवरील हल्ला लॉरेन्स बिष्णोई टोळीतील गुंडांनी केल्याचे उघड झाल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आपल्या अधिकाऱयांना आदेश देऊन तपासासाठी 20 टीम तयार केल्या. आरोपींचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले व राजस्थानच्या कोटा पोलिसांची मदत घेऊन तीन शूटरना अटक केली 1) रेहान राहीसुद्दीन (18 वर्षे, हरयाणा), 2) हृतिक कुमार ऊर्फ रोशन (22 वर्षे, बिहार), 3) फुलसिंग नरेश (18 वर्षे, हरयाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील हृतिक कुमार हा मुंबईत रॅपिडो ड्रायव्हर आहे.

टायगर श्रॉफवरील हल्ल्यांपूर्वी लॉरेन्स बिष्णोई टोळीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात सिनेनिर्माता रोहित शेट्टीच्या घराबाहेर रात्रीच्या वेळेस गोळीबार करून सलमान खानची साथ सोडण्याचा रोहित शेट्टीला इशारा दिला होता. त्याआधी सलमान खानच्या वांद्रे येथील बंगल्यापासून ते त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसपर्यंत पाठलाग करून सलमानला गोळय़ा घालण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो अयशस्वी ठरला. माजी गृहराज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांना मात्र वांद्रे येथे गोळय़ा घालून ठार मारण्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीतील शूटरना यश आले. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर लॉरेन्स बिष्णोई टोळीने मुंबईत बराच शिरकाव केलेला दिसून येत आहे.

मुंबई पोलिसांनी वरील सर्व हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 50 च्या वर गुन्हेगारांना गेल्या वर्षभरात अटक केलेली आहे. यूपी/बिहार तसेच महाराष्ट्रातील पुणे भागातून बिष्णोई टोळीचे बहुसंख्य आरोपी पकडले गेले आहेत. कुणी मुंबईत येऊन रेकी करणारे आहेत, तर कुणी शूटरना आश्रय देणारे आहेत, कुणी शूटरना पैशांचे वाटप करणारे आहेत, परंतु दोन वर्षांपूर्वी पुण्यातून लॉरेन्स बिष्णोई टोळी चालविणारा शुभम लोणकर अद्यापि मुंबई क्राईम ब्रँचच्या हाती लागलेला नाही. तो कॅनडातून गँग चालवतो असे बोलले जाते. पुण्याच्या येरवडा जेलमधील बऱयाच मराठी तरुणांची गँग शुभम लोणकरने तयार केली आहे. तीच पोरं आज मोठय़ा प्रमाणात पुण्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी काम करीत असून पुण्यात जो काही अधूनमधून खूनखराबा होतो तो लॉरेन्स बिष्णोई टोळीमुळेच!

पुण्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीचे थैमान सुरू असताना कोयता गँगनेही कहर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटचे व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाणाऱया राणा सूर्यवंशी यांच्यावर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या अनोळखी तरुणांनी पुष्पगुच्छामध्ये लपवलेला धारदार कोयता बाहेर काढून बारामती येथील विमानतळावर वार केले. गंभीर जखमी झालेले राणा दिलीप सूर्यवंशी पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचार घेत आहेत. टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला झाला त्याच दिवशीची ही घटना आहे. गुंडांना कायद्याची, पोलिसांची कोणतीच भीती राहिलेली नाही.

लॉरेन्स बिष्णोईने टायगर श्रॉफवर गोळीबार करून बॉलीवूडमध्ये खळबळ उडवून दिली. आता वांद्रे ते अंधेरी परिसरात राहणाऱया बॉलीवूडला खंडणीसाठी धमक्या वाढतील. ज्यांना धमक्या जातील त्यातील काही सिनेकलावंत घाबरून खंडणी देतीलही, तर काही जण देणारही नाहीत. तेव्हा लॉरेन्स पंपनीचे येथून पुढे धमकी सत्र सुरूच राहणार आहे. स्वतःला ‘हिंदू डॉन’ म्हणविणारा लॉरेन्स बिष्णोई हा सलमान खानला देशद्रोही, हिंदूविरोधी समजतो. त्याच्यासोबत काम करणाऱया हिंदू सिनेकलावंतांना धमक्या देतो, परंतु तोच बिष्णोई धर्माने मुसलमान असलेल्या आरोपींचा शूटर म्हणून का वापर करीत आहे? याचे त्याचे समर्थक उत्तर देऊ शकतील का? लॉरेन्स बिष्णोईविरोधात मुंबईसह देशभरात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आदी गंभीर गुह्यांच्या नोंदी आहेत, परंतु केंद्रीय गृहखात्याने बिष्णोईची चौकशी करण्यासाठी कुणालाही परवानगी गेल्या दोन वर्षांत दिलेली नाही. हे काय गौडबंगाल आहे? गुजरातच्या साबरमती जेलमध्येच बिष्णोईला का ठेवण्यात आले आहे? जेलमध्ये राहून त्याला आणखी किती खून करायचे आहेत?
पाच-दहा हजारांत शूटर यूपी, बिहारमधून आयात करण्यात येतात व त्यांना काम झाल्यावर पोलिसांकडे 24 तासांच्या आत ‘जमा’ही केले जाते. ‘युज अॅण्ड थ्रो’ ही गुंड टोळय़ांच्या म्होरक्यांची नीती असते. जोपर्यंत गुजरातच्या साबरमती जेलमध्ये ऐशआरामात असलेल्या, व्हीआयपी ट्रीटमेंट घेत असलेल्या बिष्णोईला देशभरातील जेलमध्ये फिरविले जाणार नाही, तोपर्यंत मुंबईतील शूटआऊट कधीच थांबणार नाहीत. बिष्णोई जरी साबरमती जेलमध्ये एकटा असला तरी त्याचे साथीदार जेलबाहेर आजूबाजूलाच वास्तव्य करून असतात. मुंबई, पुणे, पंजाब, यूपी, बिहारमध्ये गुन्हे करणारे बिष्णोईचे साथीदार गुजरातमध्येच सापडतात. गुजरात हे आता बिष्णोई टोळीचे आश्रयस्थान झाले आहे.