सरकारच्या लबाडीमुळे आठ महिन्यांत दीड हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या – कैलास पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांसाठी कोटय़वधीचे आर्थिक पॅकेज जाहीर केल्याचे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या लबाडीमुळे मागच्या आठ महिन्यांत तब्बल दीड हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी सरकारच्या ‘कारभारा’ची पोलखोल केली. सरकार फक्त घोषणाबाजी करते, प्रत्यक्षात करीत काहीच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यावर या वर्षी दुष्काळाचे सावट आहे. मात्र मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे पाहणी दौरे म्हणजे अक्षरशः पर्यटन सुरू असल्याचा आरोपही कैलास पाटील यांनी केला. आधीच ‘नमो शेतकरी’ योजनेतील दोन हजारांचे दोन हप्ते थकलेले असताना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली पाच हजार रुपयांची अग्रीम ही पिचलेल्या शेतकऱ्याची चेष्टा असल्याचेही ते म्हणाले. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना रोजगार हमीचे तीन लाख 47 हजार देणार होते, ते दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील सर्वच व्यावसायिकांना जीएसटी माफ केला जातो, मात्र शेतकऱ्याना इन पुट क्रेडिट का दिले जात नाही, असा सवालही त्यांनी केला.