
गेल्या काही महिन्यांत करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आपल्या कुटुंबीयांना सर्वाधिक भोगावे लागत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तुमच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवा, असे म्हणत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिवाळीपर्यंत आंदोलन थांबवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
दीपके यांनी आज इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी तुरुंगात असलेल्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची आठवण काढली. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यामुळेच हे आंदोलन पुढे जाऊ शकले. या दोघांच्या धैर्यामुळे आणि निष्ठेमुळेच आपल्याला आंदोलनाची प्रेरणा मिळत असते. मी केवळ त्यांच्या सूचनांचे पालन करत होतो; प्रत्यक्षात हे आंदोलन आशुतोष आणि सौरभ यांनीच पुढे नेले आहे. त्यांनी ज्या धैर्याने आणि विश्वासाने आंदोलनाचे नेतृत्व केले, त्यातूनच मला बळ मिळाले, असे दीपके म्हणाले.
फ्रान्समधील हिंसाचारासोबत तुलना चुकीची
सीजेपी आंदोलनाची तुलना फ्रान्समधील हिंसाचाराशी करणाऱयांवरही दीपके यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, दोन्ही देशातील परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे. आशुतोष आणि सौरभ यांनी कधीही हिंसेचा मार्ग निवडला नाही. त्यांनी करुणेची आणि शांततेची वाट धरली. त्यामुळे या आंदोलनाला हिंसेचे रूप देणे चुकीचे आहे. आपण कोणत्याही कारवाईला किंवा दबावाला भीक घालत नसून महात्मा गांधींच्या अहिंसेच्या आणि सत्याच्या विचारसरणीवरच चालत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रांका, दास यांची उच्च न्यायालयात याचिका
न्यायालयीन कोठडी वाढविण्याच्या विरोधात आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून मंगळवारी रात्रीच तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र दसऱयानिमित्त सुट्टी असल्यामुळे त्यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सौरव आणि आशुतोष यांना कारागृहात एक मिनिटही ठेवू नये, न्यायासाठी प्रतीक्षा करणे योग्य नाही, असे सीजेपीच्या अॅड. रत्ना सिंह म्हणाल्या.



























































