
ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईचा मोठा भडका उडण्याची चिन्हे आहेत. कच्च्या तेलाचे दर 111.16 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत. हा पाच महिन्यांचा उच्चांक असून यामुळे इंधन दरवाढीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील काही महिने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रचंड आव्हानात्मक राहणार आहेत.
इराण युद्ध सध्या थांबलेले असले तरीही कच्च्या तेलाचे दर कमी झालेले नाहीत. याचे कारण म्हणजे महत्त्वाचा कच्च्या तेलाचा पुरवठादार देश सौदी अरबवर हुती बंडखोरांनी अलीकडच्या काळात मोठे हल्ले केले होते. त्यात ‘अरामको’ या सौदीच्या मोठय़ा तेल पंपनीचे अतोनात नुकसान झाले आहे. येमेनमधील सुरक्षारक्षक प्रशिक्षण शिबिरावर झालेल्या हल्ल्यात 58 जणांचा मृत्यू झाला असून 2000 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे तेल पुरवठय़ावर मोठा परिणाम झाला आहे.
इराणकडून तेलवाहू जहाजांवर हल्ले
आखाती देशांजवळच्या समुद्रात गेल्या दोन आठवडय़ांमध्ये सुमारे 20 तेलवाहू जहाजांवर हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीवरही परिणाम झाला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ मंगळवारी दोन जहाजांवर हल्ले केले. त्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात जोखीम वाढली आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर कमी होण्याची चिन्हे नाहीत.
महागाई आणि व्याजदर वाढ अटळ
वाढलेले कच्च्या तेलाचे दर, कोसळलेला रुपया यामुळे देशातील आयात महाग झाली आहे. याचा परिणाम म्हणजे देशात महागाई प्रचंड वाढली असून त्यातून नजीकच्या काळात दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी जगातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. आरबीआयदेखील हाच कित्ता गिरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवरचा आर्थिक बोजा वाढणार आहे.



























































