
”जस जसं रेजिम चेंजचं राजकारण पुढे जाईल याच बिष्णोईच्या नावाखाली विरोधकांच्या हत्या होऊ शकतात किंवा त्यांच्यावर हल्ले होऊ शकतात”, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
”मी जे काल अमित शहांबद्दल बोललो हे आतापर्यंत कुणी बोलण्याचं धाडस केलं नाही. या देशातल्या माफियांच्या टोळ्या भाजपच्या छताखाली आणण्याचं काम अमित शहांनी केल, सर्व भ्रष्टाचारी गुंड यांना प्रतिष्ठा देण्याचं काम त्यांनी केलं. लॉरेन्स बिष्णोई हा अनेक वर्ष झाले साबरमती तुरुंगात आहे. अनेक राज्यांना त्याचा ताबा हवा आहे. जेव्हा एखादा कैदी हवा असतो तेव्हा ते राज्याचे पोलीस ट्रान्झिस्ट कस्टडीसाठी प्रयत्न करतात. पंजाबमध्ये मुसेवाला या गायकाची हत्या झाली. त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याची मागणी केली. मुंबईत बाबा सिद्धीकी, सलमान खान प्रकरणात मुंबई पोलिसांकडून मागणी झाली. मग गुजरातच्या साबरमती तुरुंगात जो बंदी आहे त्याचे इतर राज्यांमध्ये हस्तांतरण का होत नाही? आपण इतर देशांतून गुन्हेगार आणतो मग लॉरेन्स बिष्णोईचं का हस्तांतरण होत नाही? याचा अर्थ लॉरेन्स बिष्णोई हे फक्त नाव आहे. खरा चेहरा अमित शहांचा आहे. अमित शहा त्यांच्या नावाखाली त्यांना हवे ते गुन्हे घडवून घेतात. आज बॉलिवूडवर कंट्रोल घेण्यासाठी त्यांच्यावर हल्ले होतायत. भविष्यात या बिष्णोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात. आता जस जसं रेजिम चेंजचं राजकारण पुढे जाईल याच बिष्णोईच्या नावाखाली विरोधकांच्या हत्या होऊ शकतात हे माझं भाकीत नसून खरं सांगतोय. आता त्यांना फ्रस्ट्रेशन आलं आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
”एप्रिलमध्ये मोदींना पायउतार व्हावं लागणार. त्या दरम्यान अनेक फाईल्स उघडल्या जातील, अनेक घडामोडी घडतील. जनतेचा या सरकार विरोधातील विरोध अधिक तीव्र झालेला दिसेल. आता फक्त तुम्हाला भुगर्भातील हालचाली दिसतील. ते हातपाय हलवू शकत नाही. या क्षणी मोदी आणि अमित शहा हतबलतेने बसलेले आहेत.. पण ते राज्य चालवू शकत नाही. काल मी शिवतीर्थाच्या व्यासपीठावरून बोललो. संपूर्ण देशाने तर ऐकलं. परदेशातील वृत्तपत्रांनी देखील त्याची दखल घेतली. आता जरी रेजिम चेंजची प्रक्रिया आता जरी मंदगतीने वाटत असली तरी ती लवकरच वेग घेईल”, असेही त्यांनी सांगितले.

























































