
देशाच्या राजकारणात आगामी काही महिन्यांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे, असे सूचक विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. “पुढील दोन ते पाच महिन्यांत देशात काहीतरी गडबड होईल. काही काळ असा येईल, जेव्हा देशाला पंतप्रधानच नसेल,” असे म्हणत त्यांनी देशातील राजकीय परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर, निवडणूक प्रक्रियेवर आणि देशातील लोकशाहीच्या सद्यस्थितीवरही टीका केली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडलेल्या ‘रेजिम चेंज’च्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्याशी आपले बोलणे झाल्याचे सांगितले. पुढील दोन ते पाच महिन्यांत देशात काहीतरी गडबड होऊ शकते, असे ते म्हणाले. सरकारकडून चुका होत राहतील आणि अनेक गोष्टी समोर येत राहतील. आगामी काळात देशातील जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली, तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा, या मागणीचा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. २०१८ पासून आपण या विषयासाठी प्रयत्न करत असून, निवडणूक आयुक्तांची भेट घेऊनही हा मुद्दा मांडल्याचे त्यांनी सांगितले. मतदान केल्यानंतर आपले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे, याचे समाधान मतदाराला मिळणे आवश्यक आहे. निवडणुकीत कोण जिंकले आणि कोण हरले, हा वेगळा विषय आहे; परंतु मतदान प्रक्रियेवर मतदारांचा विश्वास असणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. इतर अनेक देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होत असल्याचा दाखला देत त्यांनी भारतातही ही पद्धत स्वीकारण्याची मागणी केली. मतमोजणीसाठी चार दिवस लागले तरी हरकत नाही; निवडणुकीचे निकाल लवकर जाहीर करण्यापेक्षा पारदर्शक प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील तरुणांमध्ये सरकारविरोधात नाराजी असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दाही उपस्थित केला. नीट परीक्षेच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी केवळ परीक्षेसाठी आंदोलन करत नव्हते, तर त्यांच्या मनातील असंतोषही त्यातून व्यक्त होत होता, असे ते म्हणाले. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याची गरज काय होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. अमेरिकेत कलाकार राजकीय नेत्यांवर उघडपणे टीका करतात; मात्र भारतात टीका करणाऱ्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला.


























































