एसबीआयवर सायबर हल्ला! ३,८९७ ग्राहकांची संवेदनशील माहिती ‘डार्क वेब’वर लिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात सायबर गुन्हेगारी वाढत चालली असून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एका सायबर हल्ल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्यामुळे ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात बॅंकेने अधिकृत पत्र जारी केले आहे. डार्क वेबवर जवळपास तीन हजार आठशे सत्त्याण्णव ग्राहकांची खाजगी माहिती उघड झाल्याचा संशय असल्याचे त्यात म्हटले आहे. या घटनेमुळे बँकेच्या मुख्य कामकाजावर किंवा आर्थिक व्यवहारांवर कोणताही मोठा परिणाम झाला नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, चार दिवसांपूर्वीच 16 ऑक्टोबर रोजी भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि संरक्षण सायबर एजन्सीकडून बँकेला या डेटा लीकबद्दल सावध करणारा संदेश मिळाला होता, असे एसपीआयच्या पत्रात म्हटले आहे. डार्क वेबवर आढळलेल्या सुमारे साडेतीन लाखांहून अधिक नोंदींची प्राथमिक पाहणी केल्यावर, त्यापैकी 3,897 नोंदींमध्ये ग्राहकांची महत्त्वाची वैयक्तिक माहिती असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान या लीक झालेल्या माहितीमध्ये ग्राहकांचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि राहत्या घरांचा पत्त्याचा समावेश आहे. याशिवाय, ग्राहकांच्या बँकेची शाखा, कर्ज खात्याची माहिती आणि लोन लीड रेकॉर्डशी संबंधित इतर कागदपत्रांची माहिती देखील यामध्ये असल्याची शंका व्यक्ती केलाी जात आहे.

दरम्यान या घटनेनंतर बॅंकेने ग्राहकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांची माहिती बाहेर आली असली तरी त्यामुळे ग्राहकांच्या नेहमीच्या बँक व्यवहारांवर किंवा मुख्य कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. बँक सुरळीत सुरू असून, सायबर सुरक्षेची खबरदारी म्हणून बँकेने तातडीने आवश्यक ती पावले उचलली आहेत, असे बॅंकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान ही माहिती खरी आहे की खटी, ती कुठून लीक झाली आणि त्यामुळे ग्राहकांना कितपत धोका निर्माण होऊ शकतो, याची सखोल चौकशी सुरू आहे. बँक या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, नियमांनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ‘सिरियसिम’ नावाच्या एका हॅकर ग्रुपने हा डेटा मिळवल्याचा दावा केला होता, मात्र बँकेने अद्याप कोणत्याही विशिष्ट हॅकर ग्रुपचे नाव घेतलेले नाही.