
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या सोनेरी मुहूर्तावर वाहन नोंदणी करण्यात वाहनधारकांनी यंदाही मोठा उत्साह दाखवला. मुंबईच्या संपूर्ण महानगर क्षेत्रात वाहन नोंदणीत तेजी दिसली. वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गतही वाहन नोंदणीमध्ये लक्षणीय वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास एक हजार 659 इतक्या अधिक वाहनांची वसई आरटीओमध्ये नोंदणी करण्यात आली. या नोंदणीमुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आरटीओच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे.
वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील वर्षी दसऱ्याच्या कालावधीत 3 हजार 105 वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा हा आकडा 4 हजार 759 वर पोहोचला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे 1 हजार 650 हून अधिक वाहनांची अतिरिक्त नोंदणी झाली आहे. यंदा सर्वाधिक नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये 2 हजार 552 दुचाकी व स्कूटर्सचा समावेश आहे. याशिवाय 788 आवजड वाहने, 639 कार, 215 प्रवासी टॅक्सी आणि 155 बसेसची नोंदणी करण्यात आली आहे.
तीनचाकी वाहनांमध्ये 36 प्रवासी रिक्षांचा समावेश आहे. तसेच 19 मालवाहू तीनचाकी वाहने, एक खाजगी तीनचाकी, 26 डंपर, 21 एक्सकेवटर, 14 बांधकामासाठी सामान वाहने, 11 क्रेन माउंटेड वाहने, 5 शेती ट्रॅक्टर आणि 3 रुग्णवाहिकांची नोंदणी झाली आहे.
नवीन वाहनांच्या नोंदणी शुल्कातून परिवहन विभागाला सर्वाधिक 14 कोटी 51 लाख 67 हजार 620 रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये कारच्या नोंदणी शुल्काचा सर्वाधिक वाटा असून, कार नोंदणीतून सुमारे 8 कोटी 18 लाख 23 हजार 876 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहन खरेदीला मिळालेला प्रतिसाद आणि नोंदणीच्या वाढलेल्या आकडेवारीमुळे वाहन बाजारातील उत्साह अधोरेखित झाला आहे.


























































