Ratnagiri News – अणुऊर्जा प्रकल्पाला आमचा ठाम विरोध; प्रशासनस्तराव कोणतीही कागदोपत्री कार्यवाही करू नका, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
दापोली तालुक्यातील वणौशी तर्फ पंचनदी भिवबंदर कार्यक्षेत्रात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. ग्रामपंचायतने प्रकल्पाच्या विरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे यापरिसरात अणुऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात कोणतीही कागदोपत्री कार्यवाही करू नये, अशी मागणी वणौशी पंचनदी व दुमदेव अणुउर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वणौशी तर्फे पंचनदी परिसरात २८०० मेगावॅटचा अणुउर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. अणुऊर्जा प्रकल्पामुळे परिसरातील आंबा-काजू-सुपारीच्या बागा उद्ध्वस्त होणार आहेत. मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला आहे. वणौशी तर्फे पंचनदी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अणुउर्जा प्रकल्पाला कडाडून विरोध करत ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाच्या प्रतीसह ग्रामस्थांनी एक निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनात अणुउर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यावेळी अशोक जाधव, अनिष निमकर, संजय दळवी, नारायण मिरगल, रमेश पाटणे, रूपेश कुटरेकर, प्रसाद देपोलकर, उल्हास मोरे, प्रभाकर बुरबांडकर, दत्ताराम गुरव, बापू कुटरेकर, जितेश पदुकले, संतोष बोरकर, चंद्रकांत निवणकर, अविनाश काष्टे, निखिल गुरव उपस्थित होते.
ग्रामस्थांना विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पच नकोय. आम्ही ग्रामसभेत अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात ठराव केला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने अणुऊर्जा प्रकल्पावर कोणतीही चर्चा किंवा जनसुनावणी आयोजित करू नये, अशी ठाम भूमिका अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने मांडली आहे.