
फ्रान्समधील ईशान्य भागात प्रशिक्षणादरम्यान लढाऊ विमान कोसळून एका वैमानिकाचा मृत्यू झाला. नॅन्सी शहराच्या बाहेरील हवाई तळाजवळ फ्रेंच मिराज 2000डी (Mirage 2000D) लढाऊ विमान कोसळले. विमानातील दुसऱ्या वैमानिकाचा शोध सुरू आहे. विमानात एक प्रशिक्षणार्थी वैमानिक होता तर दुसरा अनुभवी वेपन्स ऑफिसर (शस्त्र प्रणाली अधिकारी) होता, अशी माहिती हवाई दलाचे प्रवक्ते कर्नल डेव्हिड पापालार्डो यांनी दिली.
ड्रोनच्या मदतीने विमानाचे अवशेष शोधून काढण्यात आले असून, आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली आहेत, असे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. दोन आसनी ‘मिराज 2000डी’ हे लढाऊ विमान 1993 मध्ये सेवेत दाखल झाले होते. फ्रान्सने या विमानांचा वापर 1999 मध्ये कोसोवो, 2011 मध्ये लिबिया, तसेच अफगाणिस्तान, इराक, सीरिया आणि आफ्रिकेतील साहेल प्रदेशातील संघर्षांदरम्यान केला होता.

























































