
>> हेमांगी अरविंद नेरकर, संपादिका, कलामंच
लतादीदी, आशाताई, सुमन कल्याणपूर आणि आता विजयाबाई गेल्या. या सर्वांचा काळ सुवर्णकाळ होता. मराठी नाटय़क्षेत्र आणि मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱया ज्येष्ठ दिग्दर्शिका, ज्येष्ठ अभिनेत्री विजया मेहता यांच्या निधनाने नाटय़विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची उणीव कायम जाणवत राहील. विजयाबाईंनी पारंपरिक आणि आधुनिक नाटय़शैलीचा सुंदर मिलाफ घडवत अनेक अविस्मरणीय नाटय़कृती साकारल्या आहेत. त्यातील एक नाटय़ाविष्कार चिं. त्र्यं. खानोलकर लिखित (अनुवादित) ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे नाटक म्हणता येईल. तसंच चिं. त्र्यं. खानोलकर लिखित ‘एक शून्य बाजीराव’ , चिं. त्र्यं. खानोलकर लिखित (अनुवादित) ‘हयवदन’ ही प्रायोगिक नाटके आणि ‘मी जिंकलो मी हरलो’, ‘बॅरिस्टर’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘पुरुष’, ‘बाई खुलाबाई’, ‘संध्याछाया’, ‘तीन पैशाचा तमाशा’ इ. नाटके विजयाबाईंच्या दिग्दर्शनाने गाजली आहेत. तसेच ‘एक शून्य बाजीराव’, ‘ससा आणि कासव’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘संध्याछाया’, ‘वाडा चिरेबंदी’ इ. नाटकांमध्ये विजयाबाईंनी स्वतः भूमिकाही साकारल्या आहेत.
विजयाबाईंनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि दिग्दर्शनाने मराठी रंगभूमीला सौंदर्य, नवी विचारसरणी, तसेच आधुनिकतेची दिशा दिली आहे. विजयाबाईंच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार घडले आहेत. त्यांची शिस्त, अभ्यासू वृत्ती, कामावरील निष्ठा तसेच प्रयोगशील दृष्टी यामुळे रंगभूमीवरील एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या दिसण्या, बोलण्या, चालण्यात छान रुबाब होता. ‘अजब न्याय वर्तुळाचा’ नाटकाच्या साहित्यसंघ मंदिरात होणाऱया तालमींमध्ये मी हे प्रत्यक्ष पाहिले आहे. कधी कधी माझे वडील चिं. त्र्यं. खानोलकर मला अजब न्यायच्या तालमींना नेत असत. ते माझ्या आयुष्यातील मंत्रमुग्ध करणारे दिवस होते.
विजयाबाईंचे नाटय़क्षेत्रातील कार्य नाटय़कर्मींसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. ईश्वर विजयाबाईंच्या आत्म्यास चिरशांती देवो.विजयाबाईंच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!

























































