तरुण वयातच केस पांढरे होऊ लागलेत? वेळेत करा प्रभावी उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकेकाळी पांढरे केस हे वाढत्या वयाचे लक्षण मानले जात होते. मात्र, आजकाल अनेकांच्या वयाच्या २० ते ३० वर्षांतच केस पांढरे होऊ लागतात. यामागे केवळ वयच नाही, तर अनुवंशिकता, तणाव, पोषणाची कमतरता, चुकीची जीवनशैली आणि रासायनिक उत्पादनांचा अतिवापर यांसारखी अनेक कारणे असू शकतात.

केस अकाली पांढरे का होतात?

केसांचा नैसर्गिक रंग मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे असतो. हे रंगद्रव्य केसांच्या मुळांतील मेलॅनोसाइट्स पेशी तयार करतात. या पेशींची कार्यक्षमता कमी झाली किंवा त्यांनी मेलॅनिन तयार करणे थांबवले, तर नवीन केस पांढरे किंवा राखाडी रंगाचे येऊ लागतात.

अकाली केस पांढरे होण्याची प्रमुख कारणे
आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईकांचे केस कमी वयात पांढरे झाले असतील, तर पुढील पिढीतही हा धोका वाढू शकतो.

सततचा मानसिक तणाव शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतो. त्यामुळे मेलॅनिन तयार करणाऱ्या पेशींवर परिणाम होऊन केस लवकर पांढरे होऊ शकतात.

व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी, लोह, तांबे आणि इतर आवश्यक पोषक घटकांची कमतरता केसांच्या रंगावर परिणाम करू शकते.

वारंवार हेअर डाय, स्ट्रेटनिंग, स्मूथिंग किंवा रासायनिक हेअर ट्रीटमेंट्स केल्याने केसांचे नैसर्गिक आरोग्य आणि रंग दोन्ही खराब होऊ शकतात.

अकाली केस पांढरे होणे टाळण्यासाठी काय कराल?

हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, सुका मेवा, बिया आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

व्हिटॅमिन बी१२, लोह, तांबे आणि अँटीऑक्सिडंट्स यांचे पुरेसे सेवन करा.

योग, ध्यान आणि नियमित व्यायाम मानसिक आरोग्यासह केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात.

केसांवर रासायनिक प्रक्रिया कमी करा. जास्त उष्णता देणारी उपकरणे आणि हार्श केमिकल्सचा वापर टाळा.

सौम्य शॅम्पू आणि चांगला कंडिशनर वापरा, ज्यामुळे केसांचे नैसर्गिक संरक्षण टिकून राहते.

नारळाचे तेल, कढीपत्ता, मेथी आणि आवळा यांसारखे पारंपरिक उपाय केसांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरू शकतात. आवळ्यातील व्हिटॅमिन सी केसांच्या आरोग्यास मदत करते.