
मेसेजिंग ॲप ‘WhatsApp’ ने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल केला आहे. आता तुम्हाला व्हॉट्सॲपवर तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता कोणाशी चॅट करायचे असेल तर, ते शक्य होणार आहे. कंपनीने अँड्रॉइड (Android) आणि आयफोन (iPhone) युझर्ससाठी ‘युझरनेम रिझर्व्हेशन’ नावाचे (Username Reservation) नवे फीचर सुरू केले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने आता युझर्स स्वतःचे एक युनिक (वेगळे) युझरनेम निवडू शकतील आणि याद्वारेच इतरांशी संवाद साधू शकतील. युझर्सची सुरक्षा आणि गोपनीयता अधिक मजबूत करण्यासाठी व्हॉट्सॲपकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कोट्यवधी युझर्सना त्यांच्या आवडीचे युझरनेम आधीच सुरक्षित करून ठेवता यावे, यासाठी कंपनीने ‘युझरनेम रिझर्व्हेशन’ प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. हे फीचर सध्या टप्प्याटप्प्याने वापरात आणत असून, येत्या काही महिन्यांत ते जगभरातील सर्व युझर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल.
असे रिझर्व्ह करा तुमचे युझरनेम
1. तुमचे व्हॉट्सॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करा.
2. व्हॉट्सॲप ओपन करून Settings मध्ये जा आणि Account सेक्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला ‘Username’ चा एक नवीन पर्याय दिसेल.
3. या पर्यायावर टॅप करून तुम्ही तुमच्या आवडीचे युझरनेम टाईप करू शकता. जर ते युझरनेम आधी कोणा दुसऱ्याने घेतलेले नसेल, तर ते तुमच्या नावावर रिझर्व्ह होईल.
युझरनेम निवडताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
1. युझरनेममध्ये इंग्रजीतील लहान अक्षरे (small letters), अंक (numbers), अंडरस्कोर (_) आणि डॉट (.) चा वापर करता येईल.
2. प्रत्येक युझरनेम युनिक असणे बंधनकारक आहे, म्हणजेच दुसऱ्या कोणाचे युझरनेम कॉपी करता येणार नाही.
3. युझरनेमची सुरुवात “www” ने करता येणार नाही, तसेच त्याचा शेवट “.com” किंवा “.net” सारख्या डोमेन नावांनी करता येणार नाही.
4. बनावट अकाऊंट्स (Fake Accounts) आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी हे नियम बनवण्यात आले आहेत.
आतापर्यंत व्हॉट्सॲप हे पूर्णपणे मोबाईल नंबरवर आधारित मेसेजिंग ॲप राहिले आहे. कोणत्याही नवीन व्यक्तीशी बोलायचे असल्यास नंबर शेअर करणे बंधनकारक होते. यामुळे अनेकदा प्रायव्हसी धोक्यात येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. विशेषतः व्यावसायिक (Businesses), ऑनलाइन विक्रेते, कंटेंट क्रिएटर्स आणि महिला युझर्स ज्यांना आपला नंबर प्रत्येकासोबत शेअर करायचा नसतो, त्यांच्यासाठी ही मोठी समस्या होती. आता युझरनेम फीचरमुळे या समस्येचे कायमचे निवारण होणार आहे.


























































