
अमेरिकेत 20 वर्षांपूर्वी झालेल्या एका संशयास्पद मृत्यूचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्नीला कड्यावरून ढकलून तिच्याच विम्याच्या पैशातून पती 20 वर्ष एशोआरामात आयुष्य जगला. तब्बल 20 वर्ष पत्नीचा खून केल्याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. मात्र, एक जुनं प्रकरण उजेडात आलं आणि त्याच बिंग फुटलं. पोलिसांनी सखोल चौकशी करून सबळ पुराव्यांच्या आधारे डेविडवर खून आणि विमा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र, अंतिम सुनावणी होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2006 मध्ये 29 वर्षांची बर्नैडेट वेंडर मीर ही तिचा पती डेविड वेंडर मीरसोबत यूटा येथील ‘जियोन नॅशनल पार्क’मध्ये फिरण्यासाठी गेली होती. तिथे एका धोकादायक कड्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. त्या वेळी हा एक अपघात मानला गेला होता आणि डेविडने पत्नीच्या मृत्यूनंतर विम्यामधून मिळालेल्या तब्बल 5.67 लाख डॉलर्सवर 20 वर्षे ऐशोआरामात आयुष्य घालवले. मात्र, 2022 मध्ये डेविडच्या एका जुन्या गुन्ह्यामुळे या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाले. एका महिलेने डेविडवर अल्पवयीन असताना शोषण केल्याचा आरोप केला. महिलेने केलेल्या आरोपांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासादरम्यान पोलिसांना आढळले की, पत्नीच्या मृत्यूच्या काही काळापूर्वीच डेविडने तिचा लाईफ इन्शुरन्स वाढवला होता. तसेच त्याने त्या महिलेला सांगितले होते की, जर त्याची पत्नी आयुष्यातून बाजूला झाली, तर ते दोघे एकत्र राहू शकतात. या सबळ पुराव्यांची जुळवा जुळव करण्यात आली आणि डेविडने पत्नीचा खून केल्याच पोलिसांच्या तपासात उघड झालं. या पुराव्यांच्या आधारे डेविडवर खून आणि विमा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होण्यापूर्वीच डेविडचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्याने स्वतःला इजा पोहोचवून आत्महत्या केली. कोर्टात केस चालण्यापूर्वीच आरोपीचा अंत झाल्याने मृत बर्नैडेटच्या वृद्ध आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या 20 वर्षांपासून न्यायाची वाट पाहणाऱ्या पालकांनी सांगितले की, यामुळे त्यांना मानसिक शांतता मिळाली असून त्यांच्या मुलीला अखेर न्याय मिळाला आहे.
































































